Fri, Jan 24, 2020 16:47होमपेज › Belgaon › विसर्जनावेळी बुडून सहा मुलांचा मृत्यू

विसर्जनावेळी बुडून सहा मुलांचा मृत्यू

Published On: Sep 11 2019 2:29AM | Last Updated: Sep 11 2019 12:57AM
बंगळूर : प्रतिनिधी
शाडूचा गणेश बनवून ‘गणपती गणपती’ असा भातुकलीचा खेळ खेळताना विसर्जनावेळी तलावात बुडाल्याने 6 मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये चार मुलींचा समावेश आहे. मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना कोलार जिल्ह्यातील मरदगट्टी गावच्या शिवारात घडली. 

तीन मुलांचा तलावात मृत्यू झाला, तर तीन मुलांनी केजीएफच्या सरकारी रुग्णालयात अखेरचा श्‍वास घेतला. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.  तेज, वैष्णवी, वीणा आणि रक्षिता या मुली, तर धनुष आणि रोहित अशी मुलांची नावे आहेत. 

मंगळवारी मोहरमनिमित्त शाळेला सुट्टी असल्याने ही मुले शेतात गेली होती. तिथे त्यांनी शाडूपासून गणपती बनवला. त्याची प्रतिष्ठापना केली आणि काही वेळानंतर त्याचे जवळच्या तलावात विसर्जन करण्याचा प्रयत्न केला. पण, त्या तलावात चिखल होता. तसेच पाण्याचा अंदाज न आल्याने ही सहाही मुले त्यामध्ये बुडाली. 

बराच वेळ झाल्यानंतर मुलांच्या पालकांनी शोध सुरू केला असता त्यांना तलावाच्या काठावर मुलांचे चप्पल दिसले. त्यामुळे पालकांनी तलावात उतरून शोध घेतला असता बुडून बेशुद्धावस्थेत असलेली ही मुले पालकांच्या हाती लागली. त्यांना ताडीने कोलार गोल्ड फिल्डमधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तीन मुलांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता, तर उर्वरित तिघांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सारी मुले आठ ते दहा वर्षे या वयोगटातील आहेत.