बेळगाव : प्रतिनिधी
सीमाभागात गुरुवार दि. 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन गांभीर्याने पाळण्यात येणार आहे. बेळगाव शहरात मूक सायकल फेरीचे आयोजन केले असून मराठी जनतेने आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेऊन हरताळ पाळावा. त्याचबरोबर फेरीदरम्यान शिस्त व संयम पाळण्याचे आवाहन शहर, तालुका म. ए. समितीने केले आहे.
सीमाबांधवांच्यावतीने 1 नोव्हेंबर रोजी 1956 पासून काळा दिन पाळण्यात येतो. भाषावार प्रांतरचना करताना बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी, खानापूर आदी मुंबई प्रांतातील भाग अन्यायाने तत्कालिन म्हैसूर राज्यात डांबण्यात आला. त्याविरोधात मराठी बांधव झुंज देत आहे. सीमाप्रश्नाची सोडवणूक करण्यात यावी यासाठी सर्व सनदशीर मार्ग चोखाळण्यात आले. मात्र सीमाबांधवांना अद्याप न्याय मिळालेला नाही. काळा दिन सायकल फेरीत केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी मराठी बांधव एकवटतो.
शहर म. ए. समितीच्यावतीने सकाळी 9 वा. धर्मवीर संभाजी उद्यानातून सायकल फेरीचे आयोजन केले आहे. फेरी शहराच्या विविध मार्गावरून फिरून शहापूर, वडगाव मार्गावरून मराठा मंदिर येथे फेरी येणार आहे. त्याठिकाणी सभा होणार आहे. फेरीमध्ये मराठी भाषिकांनी काळे कपडे परिधान करून, काळे झेंडे घेवून, दंडावर काळ्या फिती बांधून सहभागी व्हावे असे आवाहन मध्यवर्ती तथा शहर म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी, नगरसेवक विजय पाटील यांनी केले आहे.
‘मराठी भाषिकांनी संयम राखावा’
फेरीमध्ये मराठी भाषिक जनता मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळी काही समाजकंटक फेरीमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. असा प्रकार आढळल्यास समिती नेत्यांच्या निर्दशनास हा प्रकार आणावा. मुद्दाम घोषणा देऊन वातावरण कलुषीत होणार नाही याकडे लक्ष द्यावे. मार्ग निश्चित असल्याने मार्गावर अडथळा होणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत. झेंडे उंचावून फिरविताना रस्त्यावरील पताका फाटणार याची दक्षता घ्यावी असे आवाहन म. ए. समिती नेत्यांनी केले आहे.
कडकडीत हरताळ पाळावा : तालुका म. ए. समिती
काळा दिन सायकल फेरीत सहभागी होण्याचे आवाहन ता. म. ए. समितीने केले आहे. मराठी भाषिकांनी गुरुवारी आपले व्यवहार बंद ठेवून हरताळ पाळावा. केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार व्यक्त करण्यासाठी फेरीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन ता. म. ए. समितीचे अध्यक्ष निंगोजी हुद्दार, कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर, उपाध्यक्ष अॅड. राजाभाऊ पाटील, सरचिटणीस एल. आय. पाटील, खजिनदार एस. एल. चौगुले, युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माधुरी हेगडे यांनी केले आहे.