Thu, Dec 12, 2019 22:36होमपेज › Belgaon › सीमाप्रश्‍न लढ्यात शिवसेना अग्रभागी

सीमाप्रश्‍न लढ्यात शिवसेना अग्रभागी

Published On: Feb 09 2019 1:40AM | Last Updated: Feb 08 2019 10:45PM
बेळगाव : प्रतिनिधी

शिवसेना आणि सीमाप्रश्‍न यांचे नाते अतुट असे आहे. सीमाप्रश्‍नाची सोडवणूक व्हावी, सीमाभागातील लाखो मराठी बांधव महाराष्ट्रात यावेत, यासाठी शिवसेना प्रारंभापासून आक्रमक आहे. यासाठी 67 हुतात्म्यांनी मुंबईत रक्त सांडले आहे.  सीमाप्रश्‍न सुटेपर्यंत शिवसेना सीमाबांधवांसोबत असून प्रत्येक लढ्यात अग्रभागी राहील, अशी ग्वाही भुदरगडचे शिवसेनेचे आ. प्रकाश आबिटकर यांनी दिली.
रामलिंग खिंड गल्ली येथील सम्राट अशोक चौकात 8 फेब्रुवारी 1969 रोजी मुंबई येथील हुतात्म्यांना अभिवादन कार्यक्रम शिवसेनेतर्फे शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेना, मध्यवर्ती म. ए. समिती नेत्यांसह सीमाबांधव उपस्थित होते. 

शिवसेना कोल्हापूर जिल्हा (ग्रामीण) प्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, माजी आ. अरविंद पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, सहसंपर्कप्रमुख अरविंद नागनुरी यांच्या हस्ते हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
आ. आबिटकर म्हणाले, सीमाबांधवांना शिवसेनेने नेहमीच आधार देण्याचे काम केले आहे. सीमाभाग हा महाराष्ट्राचा असून तो महाराष्ट्रात समाविष्ट झाला पाहिजे ही आग्रही मागणी आहे. सीमाप्रश्‍न खटला न्यायालयात सुरू आहे. यासाठी आवश्यक मदत शिवसेनेतर्फे करण्यात येईल. तज्ज्ञ आणि उच्चाधिकार समितीची बैठक बोलाविण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. 
दीपक दळवी म्हणाले, सीमाप्रश्‍नाच्या प्रत्येक लढ्यात शिवसेनेने साथ दिली आहे. सीमाबांधवांवर होणार्‍या अत्याचाराचा जाब महाराष्ट्रात विचारण्याचे काम निष्ठेने शिवसेनेने केले आहे. सीमाप्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी छेडलेल्या आंदोलनात 67 हुतात्म्यांनी हौतात्म्य पत्करले. हे बलिदान सीमावासीय कधीही विसरणार नाहीत.

विजय देवणे म्हणाले, सीमाबांधवांच्या पाठीशी शिवसेना नेहमीच छातीचा कोट करून उभी राहात आली आहे. सीमाभागात मराठी माणसांवर होणार्‍या अन्यायाचा जाब कोल्हापूर, सांगली, सातारा भागात प्रथम शिवसेनेतर्फे करण्यात येतो. सीमाबांधवांवर होणार्‍या अन्यायाचा जाब भविष्यातही विचारला जाईल.

माजी आ. मनोहर किणेकर, माजी आ. अरविंद पाट जिल्हा शिवसेनाप्रमुख प्रकाश शिरोळकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, सहसंपर्कप्रमुख अरविंद नागनुरी यांनीही आदरांजली वाहिली.यावेळी संयुक्त महाराष्ट्र, शिवसेना आणि अमर रहे, अमर रहे, हुतात्मा अमर रहे अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, तालुकाप्रमुख सचिन गोरले, रिक्षासेना प्रमुख विजय मुरकुटे, शहर प्रमुख दिलीप बैलूरकर, प्रवीण तेजम, प्रकाश राऊत, राजकुमार बोकडे, राजू तुडयेकर, तानाजी पावशे आदी उपस्थित होते. 

महाराष्ट्राच्या पत्राचा पाठपुरावा करू

सीमाप्रश्‍नाच्या न्यायालयीन कामकाजाबाबत महाराष्ट्र सरकारने आश्‍वासन दिले आहे. तज्ज्ञ आणि उच्चाधिकार समितीची बैठक बोलाविण्याबाबत पत्र पाठविले आहे. याची त्वरित अमंलबजावणी करण्यासाठी आणि पत्रातील इतर आश्‍वासनांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे, आश्‍वासन भुदरगडचे आ. प्रकाश आबिटकर यांनी दिलेे.

शिवसेनेने मुंबई येथे पुकारलेल्या 1969 च्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम शुक्रवारी बेळगाव शिवसेनेतर्फे आयोजित केला होता. त्यानंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आ. आबिटकर यांच्याशी मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेत्यांनी चर्चा केली. यावेळी आ. आबिटकर बोलत होते.

यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश मरगाळे आदी उपस्थित होते. दळवी यांनी आ. आबिटकर यांना महाराष्ट्र सरकारकडून आलेल्या पत्राबाबत माहिती दिली. सीमाखटल्याच्या दृष्टीने त्वरित हालचाली होणे आवश्यक असल्याचे सांगितले. आ. आबिटकर यांनी खटल्यासंदर्भातील कामकाजाचा सातत्याने पाठपुरावा करू. उच्चाधिकार समितीची बैठक कोल्हापुरात आयोजित करण्याबाबत  सातत्याने प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिले.