Mon, Jun 17, 2019 10:12होमपेज › Belgaon › शिवपुतळे व्हावेत संस्कार केंद्र

शिवपुतळे व्हावेत संस्कार केंद्र

Published On: Jan 13 2019 1:36AM | Last Updated: Jan 13 2019 1:36AM
कडोली : प्रतिनिधी 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शोभेची वस्तू न राहता युवकांसाठी संस्काराचे केंद्र व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खा. शरद पवार यांनी केले. कडोली (ता. बेळगाव) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे लोकार्पण करून पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी कर्नाटकाचे वनमंत्री सतीश जारकीहोळी होते. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, दुरुदुंडेश्‍वर वीरक्‍तमठाचे गुरुबसवलिंग स्वामींसह माजी मंत्री, आमदार व्यासपीठावर उपस्थित होते.

पवार म्हणाले, देशात अनेक राजे-राजवाडे होऊन गेले. चंद्रगुप्त, महाराणा प्रताप अशा राजांना त्यांच्या घराण्याच्या नावाने ओळखले जाते. केवळ शिवाजी महाराज हे भोसल्याचे राजे म्हणून नव्हे, तर जनतेचे राजे म्हणून ओळखले जातात. सत्तेचा उपयोग सामान्यांसाठी कसा करायचा, हे त्यांच्याकडून शिकायला हवे. त्यांनी आयुष्यभर सामान्यांना सन्मानाची वागणूक दिली. महिलांवरील, शेतकर्‍यांवरील अन्याय, अत्याचार त्यांनी कधीच सहन केला नाही. म्हणून ते युगपुरुष आणि रयतेचे राजे ठरले.

सिद्धरामय्या म्हणाले, छत्रपती शिवरायांना एका प्रांतात, जातीत, धर्मात किंवा भाषेत मर्यादित ठेवणे चुकीचे आहे. ते एक राष्ट्राचे युगपुरुष होते. त्यांनी रयतेचे राज्य उभारले. आजच्या युवकांनी त्यांच्या इतिहासाचा अभ्यास करून त्यांचे विचार आचरणात आणावे.

वनमंत्री जारकीहोळी म्हणाले, शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर रहावा म्हणून या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. आज कन्नड आणि मराठी भाषिक एकाच व्यासपीठावर आले आहेत. हा उपक्रम गावाने राबवला आहे. मराठीच्याही वृध्दीसाठी आपण प्रयत्न केले आहेत, यापुढेही करणार आहे. मराठी माणसांना राजकीय पदे यापुर्वीही देण्यात आली आहेत. कोणताही भेदभाव न करताना हे बंधुत्व  यापुढेही कायम ठेऊया.