Mon, Jul 13, 2020 06:42होमपेज › Belgaon › सात हजारांवर शस्त्रे झाली सरकारजमा

सात हजारांवर शस्त्रे झाली सरकारजमा

Published On: Mar 28 2019 1:37AM | Last Updated: Mar 28 2019 1:37AM
बेळगाव : अंजर अथणीकर

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, म्हणून जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाकडून जिल्ह्यातील परवानाधार शस्त्रे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात बेळगावसह 7 हजार 515 शस्त्रे असून, यातील 7 हजार 366 शस्त्रे सरकारकडे जमा करण्यात आली आहे. 149 हत्यारे मात्र विविध कारणासाठी परवानाधारकांकडेच राहतील.

ज्यांच्या जीवाला धोका आहे किंवा जे लोक मोठ्या रक्कमेची ने-आण करतात, दुर्गम भागत राहतात, जंगली प्राण्याचा धोका अशा व्यक्तींनी आपल्या सुरक्षेसाठी अर्ज केल्यास त्यांना त्यांच्या मागणीनुसार रिव्हॉल्वर,  पिस्तूल, डबल बार, सिंगल बार बाळगण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाकडून परवानगी देण्यात येते. यासाठी परवानाधारकाची मानसिक स्थिती, त्याच्यावर पूर्वी कोणते गुन्हे आहेत का, त्याला हत्याराची गरज किती याची पडताळणी  करण्यात येते. हत्याराचा परवाना देताना अत्यावश्यक असल्यासच देण्यात यावा अशी सक्तीची तरदूत आहे. 

बेळगाव जिल्ह्यात परवाना असलेल्या हत्यारांची संख्या 7 हजार 515 आहे.  बेळगाव जिल्ह्यात 6 हजार 6 हत्यारे असून, बेळगाव शहरात 1 हजार 509 इतके हत्यारे आहेत. बेळगाव जिल्ह्यातील 5 हजार 932 आणि बेळगाव शहरातील 1 हजार 434 हत्यारे संबंधित पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.

बेळगाव जिल्ह्यात 74 आणि बेळगाव शहरातील 75 जणांकडे मात्र निवडणूक काळातही हत्यारे राहणार आहेत. बँकेतील सुरक्षा रक्षक, वित्तीय कंपन्यामधील सुरक्षा रक्षक यांना ही मुभा देण्यात आली 
आहे. हत्यारे जमा करण्यासाठी 24 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. तर 149 जणांना निवडणूक काळातही हत्यार ठेवणे गरजचे वाटल्याने त्यांची हत्यारे आता परवानाधारकाकडेच राहणार आहेत.  निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ही हत्यारे पुन्हा परवानाधारकाकडे परत करण्यात येणार आहेत.

खा. कोरेंचा रक्षक शस्त्रधारक

खा. प्रभाकर कोरे यांच्यावर 2006 मध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. त्यांच्या सुरक्षा रक्षकाकडे निवडणूक काळातही शस्त्र ठेवण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे. जिल्ह्यातील इतर सर्व राजकीय पदाधिकार्‍यांकडील शस्त्रे जमा करून घेण्यात आली आहेत.

वित्तीय संस्था, बँकाचे सुरक्षा रक्षक यांच्याकडे शस्त्रेे राहणार आहेत. त्यांनी दिलेल्या अर्जाप्रमाणे पडताळणी करुन त्यांच्याकडे शस्त्रे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- सुधीरकुमार रेड्डी, जिल्हा  पोलिसप्रमुख.

निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर जमा झालेली हत्यारे परत करण्यात येतील.  तत्पूर्वी त्या त्या भागातील परस्थिती, तणाव आदीची पडताळणी करण्यात येईल. कायदा आणि सुव्यरवस्थेचा प्रश्‍ना निर्माण होणार नाही याची खात्री पटल्यानंतर शस्त्रे परत देण्यात येतील.
- यशोदा वंटगोडी,  पोलिस उपायुक्त, बेळगाव.