बेळगाव : प्रतिनिधी
कैद्यांची बडदास्त ठेवण्यासाठी कुख्यात असलेल्या हिंडलगा कारागृहाची मंगळवारी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी झडती घेऊन टीव्ही, मोबाईल सिमकार्डससह तंबाखू आणि शेंगासारखे खाद्यपदार्थही जप्त केले. पोलिस आयुक्त, उपायुक्त यांच्यासह 15 पोलिस अधिकारी व 200 पोलिसांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी 7 वा. धाड घालून कारागृहातील बराकीमधून संशयित वस्तू जप्त केल्या.
निवडणुकीच्या कालावधीत कारागृहातील कैद्यांची बडदास्त ठेवण्याच्या उद्देशाने त्या वस्तूंचा पुरवठा केला असावा, असा पोलिस अधिकार्यांना संशय आहे. या धाडीमुळे हिंडलगा कारागृह अधिकार्यांमध्ये व कैद्यांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. फ्लॅट्रॉन टीव्ही, रेडिओ,साखरेचा डबा, चुन्याची दोन पाकिटे, खैनीची 5 पाकिटे, प्लास्टिक पिशवीत असलेल्या दीड किलो तंबाखू, चार राजेश बिडीची पाकिटे, चार माचीस, गव्हाचे पीठ, मॅगी नुडल्स पाकीट, प्लास्टिक डब्यामध्ये ठेवण्यात आलेला मासा, हालसीन पापडची 6 पाकिटे, उडीज पापडाची दोन पाकिटे आणि चक्क भाजलेल्या शेंगाही या साहित्यात आहेत. त्याबरोबरच 1 किलो मैद्याचे पाकीट, 4 उडीद डाळीची पाकिटे, कोथिंबीर बी, 25 मसाला पाकिटे, 1495 रोख रक्कम, अॅल्युमिनियमचे भांडे, खोबरे किसण्याची किसणी, एक थर्मास, सॉसची 5 पाकिटे, गोडे तेल, अर्धे पोते भाकरी आदी वस्तूही जप्त केल्या.
पोलिस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त सीमा लाटकर आणि सहायक अधिकार्यांनी ही कारवाई केली. याआधीही हिंडलगा कारागृहातून मोबाईल जप्त करण्यात आले होते.
Tags : SIM card, TV seized Hindalagi, belgaon news