Sun, Dec 15, 2019 03:13होमपेज › Belgaon › बेळगाव, धर्मस्थळमध्ये रॉकेट बॉम्ब प्रशिक्षण

बेळगाव, धर्मस्थळमध्ये रॉकेट बॉम्ब प्रशिक्षण

Published On: Jan 07 2019 1:11AM | Last Updated: Jan 07 2019 1:11AM
बेळगाव, बंगळूर : प्रतिनिधी

कर्नाटकातील काही पुरोगामी विचारवंतांच्या हत्येचा कट आखण्यात आला होता. या प्रकरणी महाराष्ट्रातील डॉ.वीरेंद्र तावडे आणि अमोल काळे यांच्या टोळीतील काहीजणांना बेळगाव आणि धर्मस्थळमधील जंगलात रॉकेट बॉम्बचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, बेळगावातच पिस्तूल केल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असणारा संशयित शरद कळसकर ऊर्फ छोटू (रा. औरंगाबाद) याने याबाबत कबुली दिली आहे. 2010-11 मध्ये हृषीकेश देवडेकर ऊर्फ मुरळी, सचिन अंदुरे यांच्यासह सुमारे 15 प्रमुखांनी औरंगाबादमधील गावात जाऊन धार्मिक शिकवण दिली. विकास ऊर्फ दादा याने लव्ह जिहाद, गोहत्या आदींसंबंधी व्हिडिओ दाखविले. त्यामुळे प्रभाव पडून गावोगावी आयोजित सभांमध्ये भाग घेतल्याचे कळसकरने चौकशीवेळी सांगितल्याचे समजते.

2013 मध्ये वीरेंद्र तावडे व अमित दिगवेकरची भेट घेतली. हिंदू धर्माविरोधी बोलणार्‍यांना संपविण्याची सूचना तावडेने दिली. मित्र उमेश सुरासे याच्या शेतात एअरगन प्रशिक्षण घेतले. त्यासाठी 2 हजार रुपये तावडेने दिले.औरंगाबापासून 25 कि.मी. अंतरावरील जंगलात पिस्तुलाचे प्रशिक्षण घेतले. 2014 डिसेंबरमध्ये अंदुरेसोबत बेळगाव गाठले. तावडे, दिगवेकरसह पंधराजण तेथे होते. जांबोटी (ता. खानापूर) येथील भरत कुरणेच्या शेतात नेण्यात आले. लोखंडी नळी, जिलेटिन आणि डिटोनेटरचा वापर करून रात्री 9.30च्या सुमारास स्फोट घडवून आणण्यात आला. 2015 मध्ये पुन्हा तावडे भेटला. कर्नाटकात दोघांना संपवायचे आहे. त्यासाठी तू स्वत:च बेळगावला जाऊन पिस्तूल तयार कर, अशी सूचना त्याने दिली. त्याच वर्षात ऑगस्टमध्ये धर्मस्थळला प्रशिक्षणासाठी नेण्यात आले. तेथे बंगालमधील प्रताप हजार  (महाराष्ट्रात प्रशिक्षण देणारा) आणि अमोल काळेने प्रायोगिकपणे बॉम्बस्फोट घडविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. तेथील गोशाळेत नॉड बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. रॉकेट बॉम्बस्फोटही केला. प्रशांत पुजारी नामक गोरक्षकाचा खून झाल्याने पोलिस गस्त वाढली होती. त्यामुळे प्रशिक्षण थांबवून बेळगाव गाठले.

बेळगावात पिस्तूल तयार केले

2017च्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात बेळगावात असतान पिस्तूल तयार केले. त्यानंतर गौरी लंकेश हत्येसाठी काही बैठका घेतल्या. परशराम वाघमारेलाही बेळगावातच पिस्तुलाचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती कळसकरने चौकशीदरम्यान दिल्याचे समजते.