बेळगाव : प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यातील पूर्व पश्चिम भागात काजू व्यापारी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील व बेळगाव परिसरातील काजू जमा करून फॅक्टरीला पाठविण्याचा व्यवसाय करतात. शुक्रवार 25 रोजी बेळगुंदीत एपीएमसीचे अधिकारी असल्याची बतावणी करून काजू व्यापार्यांकडे एपीएमसीचा व्यापारासाठीचा अधिकृत परवाना नाही व एक टक्का रक्कम एपीएमसीला दिली नाही, या कारणावरून तुमच्यावर दंडात्मक कारवाई का करू नये, असा दम भरत लाखो रुपयाची रक्कम व्यापारीवर्गाकडून वसूल करून पलायन केले.
बेळगुंदी परिसरात महाराष्ट्रातून एक टक्का कर भरून काजू व्यापारी काजू आणतात. ते आपल्या गोदामामध्ये जमा करून ठेवतात. काजू व्यापार्यांकडे व्यापार करण्याचा ऑनलाईन उद्योग परवाना आहे. मात्र त्यांच्याकडे एपीएमसीकडून व्यापार करण्यासाठी लागणारा परवाना नाही. महाराष्ट्रातून काजू खरेदी केला असला तरी कर्नाटकात व्यापार करताना खरेदी केलेल्या रकमेवर एक टक्का कर एपीएमसीला भरणे आवश्यक आहे.
एपीएमसी परवाना आवश्यकच
कर्नाटकात व्यापार करावयाचा असेल तर एपीएमसीकडून व्यापार परवाना आवश्यक आहे. काही व्यापारी हा परवाना न घेताच काजूचा व्यापार करतात. वेळोवेळी अधिकारी तसेच तोतया अधिकारी घटनास्थळी भेट देऊन रोख रक्कम उकळतात. यामुळे व्यापार करण्यासाठी परवाना घ्यावा, असे आवाहन एपीएमसीने केले आहे.