Sun, Dec 15, 2019 05:58होमपेज › Belgaon › कारागृहासमोरील मार्ग दोन वर्षे अंधारात

कारागृहासमोरील मार्ग दोन वर्षे अंधारात

Published On: Jul 19 2019 2:14AM | Last Updated: Jul 18 2019 8:58PM
हिंडलगा : वार्ताहर

पथदिपांचे प्रत्येक महिन्याला येणारे लाखो रुपयांचे वीज बिल हिंडलगा ग्रा. पं. ची डोकेदुखी बनली आहे. सार्वजनिक बांधकाम खाते आणि ग्रा. पं. यांच्यामध्ये वीज बिलावरून कलगीतुरा रंगला आहे. यामध्ये नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे.

हिंडलगा केंद्रीय कारागृहासमोर असणारे पथदीप सुमारे दोन वर्षापासून बंद अवस्थेत आहेत. हेस्कॉमचे बील अदा करण्यात आले नसल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हेस्कॉमचे 6.5 लाख रुपये बिल थकीत आहे. हे बिल ग्रा. पं. ने अदा करायचे की सार्वजनिक बांधकाम खात्याने यावरून मतभेद निर्माण झाले आहे. याबाबत गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्री, राज्यपाल पर्यंत तक्रारी केल्या आहेत. परंतु अद्याप नागरिकांना दिलासा मिळालेला नाही.

याचा फटका परिसरातील व्यापारी, नागरिक, शाळा, बसस्थानक, कारागृह यांना सहन करावा लागत आहे. यामुळे थकीत वीज बिल भरून पथदीप सुरू करावेत, अशी मागणी होत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने 2015 मध्ये श्रीनाथ नगर पासून विठ्ठल-रखुमाई मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात आले. त्यानंतर रस्त्याच्यामध्ये अधिक क्षमतेचे 21 खांबावर  42 पथदीप बसवण्यात आले.  हे पथदीप 2015 पासून 8 डिसेंबर 2017 पर्यंत सुरू होते. त्यानंतर मात्र पथदीप बंद पडले आहेत. यामुळे नागरिकांच्या समस्येत भर पडली आहे.

याबाबत नागरिकांनी ग्रा. पं., हेस्कॉम, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍याकडे तक्रारी केल्या. परंतु त्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. ग्रा. पं. कडून सदर पथदीप सार्वजनिक बांधकाम खात्याने उभारल्याने त्यांनी बिल अदा करण्याची सूचना केली. तर सार्वजनिक बांधकाम खाते ग्रा. पं. ची जबाबदारी असल्याचे सांगत आहे. यामुळे बिल भरण्याची जबाबदारी कोणाची असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ग्रा. पं. आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने एकत्र येऊन तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. पथदीप बंद असल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे. यामुळे लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे. 

अंधारामुळे अपघात

सध्या या परिसरात रात्रीच्यावेळी अंधार राहत आहे. यामुळे अपघात घडत आहे. एका वाहनांने रस्त्याच्या दुभाजकावर उभारण्यात आलेल्या वीज खांबालाच धडक दिली आहे. यामुळे वीज खांब वाकला आहे. हे टाळण्यासाठी पथदीप सुरू करण्याची मागणी होत आहे.

रस्ता दुभाजकावर उभारण्यात आलेले पथदीप वीज बिल अदा करण्यात आले नसल्याने बंद आहेत. याबाबत तक्रार केली आहे. परंतु अधिकार्‍यांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.  यातून अपघात घडण्याची शक्यता आहे.
-नागेश माने, ग्रामस्थ