Sun, Dec 08, 2019 06:16होमपेज › Belgaon › ‘वर्दी रिक्षां’वर ‘वर्दी’ची कारवाई

‘वर्दी रिक्षां’वर ‘वर्दी’ची कारवाई

Published On: Jun 26 2019 1:38AM | Last Updated: Jun 26 2019 1:38AM
बेळगाव : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी ‘वर्दी रिक्षा’ आणि दुचाकी यांची धडक होऊन रिक्षा कलंडल्याने मंगळवारी सकाळी पाच विद्यार्थी जखमी झाले. त्यापैकी तिघांना जास्त दुखापत झाली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर  जागे झालेल्या पोलिसांनी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या रिक्षाचालकांकडून दंडवसुलीची कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत 60 रिक्षांवर कारवाई करताना प्रत्येकी 3 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

दुचाकीला धडकल्याने रिक्षा पलटी झाल्याची घटना  सदाशिवनगरमध्ये लक्ष्मी संकुलासमोरच्या चौकात घडली. कलाश्री बागेवाडी (वय 9), प्रथमेश पाटील (वय 8), अथर्व खन्नूकर (वय 9), कुमार निलजकर (वय 9) अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे सर्व विद्यार्थी मराठी विद्यानिकेतनमध्ये शिकत असून बी. के. कंग्राळीचे रहिवासी आहेत. एका विद्यार्थ्याच्या चेहर्‍याला खरचटले असून, दुसर्‍या विद्यार्थ्याच्या हाताचे हाड मोडले आहे. तर तिसर्‍या विद्यार्थ्याच्या डावा हात्याला जखम झाली आहे. 

मंगळवारी सकाळी 9.30 वाजता बेळगावकडेे येणारा रिक्षा व सदाशिवनगरहून केएलई रोडकडे जाणार्‍या दुचाकीमध्ये अपघात घडला.  रिक्षामध्ये परवान्यापेक्षा अधिक मुले भरली होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.  रिक्षाचालकाने ब्रेक लावताच रिक्षा एक बाजूला कलंडली. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन मुले जखमी  झाली. 

त्याच रस्त्यावरून येणारे अ‍ॅड. सुधीर चव्हाण यांनी पुढाकार घेऊन मुलांना रूग्णालयात दाखल केले. त्यांना आजुबाजूच्या लोकांनी मदत केली. घटनेची माहिती मिळताच मराठी विद्यानिकेतनच्या शिक्षकांनीही  घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. तीन विद्यार्थी रुग्णालयात दाखल असून, मंगळवारी रात्रीपर्यंत विविध तपासण्या सुरू होत्या. दोन विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी जाऊन देण्यात आले. घटनेची नोंद रहदारी उत्तर विभाग पोलिस स्थानकात झाली आहे. 

अपघातानंतर पोलिसांना जाग 

विद्यार्थ्यांची ने -आण करणार्‍या रिक्षांमध्ये बकर्‍याप्रमाणे मुलांना कोंबले जाते. त्यामुळे नियंत्रण हाताबाहेर जाते. याविरुद्ध वारंवार आवाज उठवूनही कारवाई झालेली नव्हती. मात्र अपघातानंतर मात्र रहदारी पोलिस खाते खडबडून जागे झाले आहे. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी भरणार्‍या 60 रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून प्रत्येकी 3 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. दिवसभर रहदारी पोलिसांनी वेगवेगळ्या ही कारवाई केली. रहदारी पोलिस निरीक्षक आर.आर.पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता. 

परवानगी 6 विद्यार्थ्यांचीच

रिक्षामध्ये सहा विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याची परवानगी पोलिस प्रशासनाकडून आहे. मात्र सर्रास रिक्षाचालक 10 ते 12 विद्यार्थी कोंबतात. तसेच अनेक रिक्षाचालक स्वतःच्या आसनावर डावीकडे आणि उजवीकडे असे दोन विद्यार्थी बसवून घेतात. यातून रिक्षाचे नियंत्रण अवघड बनते. अशा रिक्षांवर मंगळवारी कारवाई करण्यात आली. तसेच 6 पेक्षा अधिक विद्यार्थी असणार्‍या रिक्षांमधील विद्यार्थ्यांना उतरवून त्यांना पोलिस वाहनातून शाळेपर्यंत पोचवण्यात आले, अशी माहिती रहदारी निरीक्षक आर. आर. पाटील यांनी दिली.