Sun, Dec 08, 2019 21:46होमपेज › Belgaon › ...तर कृत्रिम पाऊस

...तर कृत्रिम पाऊस

Published On: May 19 2019 1:33AM | Last Updated: May 19 2019 1:33AM
बेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटकच्या इतिहासात प्रथमच टँकरची संख्या तीन हजारांवर गेली असून, दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी केंद्राकडे मदत मागण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. 6 जूनपर्यंत पाऊस न पडल्यास कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी ठेका देण्यात येईल, मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी 13 कोटीची कामे रोहयोंतर्गत  उपलब्ध करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात महसूलमंत्री देशपांडे यांनी अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी उपस्थित होते. गेल्या अठरा वर्षात चार वर्षे वगळता राज्यात दुष्काळ पडला आहे. यावेळी दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. राज्यात  2 हजार 999 टँकरने चार हजारहून अधिक गावांना पिण्याचा पाणी पुरवठा सुरू आहे. रामनगर, जामनगर,कोडगू, धारवाड आणि गदग हे पाच जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्यांत टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.

पाण्याचे स्त्रोत आटत चालले असलेतरी पिण्याचे पाणी कमी पडू दिले जाणार नाही. 216 कूपनलिका खोदण्यासाठी निधी मंजूर करुन देण्यात आला आहे. आवश्यक  त्या ठिकाणी चारा छावणी, टँकर उपलब्ध करुन देण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले आहेत. राज्यातील सर्व तहसीलदारांना 40 ते 45 लाखाचा तात्काळ निधी मंजूर करण्यात आला आहे. दुष्काळ निवारणासाठी हा निधी खर्च करण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला आहे. 

दुष्काळ निवारणासाठी केंद्राचीही मदत मागण्यात आली आहे. दुष्काळ निवारणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. यासाठी विरोधकांनीही यामध्ये राजकारण करु नये. 

महाराष्ट्राकडून पाण्याची नितांत गरज

महाराष्ट्र सरकारने कृष्णा नदीतून चार टीएमसी पाणी सोडावे, अशी मागणी आम्ही केली आहे. ही विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे. त्यानंतर महाराष्ट्राने पाण्यासाठी पैसे न देता सोलापूरसाठी पाणी द्यावे अशी मागणी केली आहे. यासाठी करार होणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी त्यांनी पाणी मागितले आहे. त्यासाठी कर्नाटकला खर्च येणार आहे. यासाठी पाटबंधारे विभाग अभ्यास करत आहे. महाराष्ट्रातून पाणी आल्यास कृष्णा काठच्या 120 गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न मिटणार आहे.