होमपेज › Belgaon › प्रादेशिक आयुक्त मेघण्णावर यांचे उफाळले कन्नडप्रेम

प्रादेशिक आयुक्त मेघण्णावर यांचे उफाळले कन्नडप्रेम

Published On: Feb 14 2019 1:33AM | Last Updated: Feb 14 2019 1:33AM




बेळगाव : प्रतिनिधी

प्रादेशिक आयुक्त पी. ए. मेघण्णावर यांनी आपल्या कार्यालयासमोर असलेल्या लाल-पिवळ्या ध्वजाला कर्नाटक ध्वज म्हणून मान्यता देण्याबरोबरच हा ध्वज हटवण्यासाठी केलेला अर्ज कन्नड भाषेत देण्याची सक्ती केली आहे. मूळ अर्ज हिंदी भाषेत असून, त्याला त्यांनी ‘इतर भाषेतील अर्ज’ असे संबोधून हिंदी भाषेचाही अवमान केला आहे. मेघण्णावर यांच्या या कृतीबद्दल केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोेगाकडे तक्रार करण्यात आली आहे.  महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते सूरज कणबरकर हे तक्रारदार आहेत. 

प्रादेशिक कार्यालयाकडून बेळगाव जिल्ह्यासह सात जिल्ह्यांचा कारभार चालतो. या कार्यालयासमोर 2008 पासून लाल-पिवळा ध्वज लावण्यात आला आहे. हा ध्वज बेकायदेशीररीत्या लावण्यात आला असल्याची तक्रार महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते सूरज कणबरकर हे गेली चार वर्षांपासून करीत आहेत. याची दखल घेत मेघण्णावर यांनी हा ध्वज कर्नाटकचा असल्याने तो हटवता येत नसल्याचे पत्राने कळवले. मुळात कर्नाटक शासनाचा ध्वज वेगळा नसतानाही मेघण्णावर यांनी तो कर्नाटकचा ध्वज कसा जाहीर केला, याबाबत खुलासा करण्यात यावा, असे पत्र कणबरकर यांनी त्यांना दिले होते. या पत्राला मेघण्णावर यांनी 9 फेब्रुवारीरोजी उत्तर दिले. ते पत्र कणबरकर यांना बुधवारी मिळाले. यामध्ये मेघण्णावर यांनी तुम्ही इतर भाषेत अर्ज न करता तो कन्नडमध्ये करा, अशी सूचना केली आहे. 

भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार मराठीमध्ये कागदपत्रे मिळण्याचा अधिकार असतानाही मेघण्णावर यांनी कन्नडची सक्ती करुन या कायद्याचा भंग केला आहे. याबाबत कणबरकर यांनी केंद्रीय अल्पसंख्याक आयोग, राष्ट्रीय मानव अधिकार आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विभागीय सचिवाकडे तक्रार केली आहे. यामध्ये मेघण्णावर  यांनी कर्नाटकचा ध्वज बेकायदेशीरपणे जाहीर केला आणि कन्नडमध्ये अर्ज करण्यास सांगून कन्नडसची सक्ती केली याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.