होमपेज › Belgaon › साहित्य संमेलनातून रसिकांना मिळाली नवप्रेरणा

साहित्य संमेलनातून रसिकांना मिळाली नवप्रेरणा

Published On: Jan 22 2019 1:31AM | Last Updated: Jan 21 2019 11:38PM
निपाणी : प्रतिनिधी

साहित्य रसिक मंडळातर्फे झालेल्या दोन दिवसीय निपाणी भाग साहित्य संमेलनाने निपाणीकरांचे बौध्दिक प्रबोधन झाले. मराठी साहित्य संमेलनातून रसिकांना नवप्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्‍त होत आहे.
संमेलनास दिग्गज साहित्यिकांची उपस्थिती, परंपरागत मांडणीने आयोजित केलेली विविध सत्रे आणि साहित्य रसिकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून खर्‍याअर्थाने हे संमेलन यशस्वी ठरले. सन 2008, 2009 व 2011 नंतर खंडित झालेली साहित्य संमेलनाची परंपरा पुन्हा सुरू झाल्याने निपाणीसह परिसरातून आनंद व्यक्‍त होत आहे. या संमेलनासाठी निवडलेले ठिकाण राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवन हे सर्वदृष्टीने पूरक  ठरले. 

शनिवारी पारंपरिक पद्धतीने ग्रंथदिंडी काढण्यात आली. त्यामध्ये मराठमोळ्या वेशात सहभागी झालेल्या महिला, विद्यार्थ्यांचे घोषणा फलक, सजीव देखावा हे लक्षवेधी ठरले. संमेलनाध्यक्षा प्रतिमा जोशी यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्‍त केलेली खंत अनेकांना भारावून टाकणारी व साहित्य अभ्यासकांना विचार करावयास लावणारी होती. रात्री डॉ. राजेश उमाळे यांच्या गझल रंग  कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
रविवारी सकाळच्या तिसर्‍या सत्रात डॉ. शंतनू कुलकर्णी यांनी सांगितलेला अवकाशयात्री कल्पना चावला यांचा जीवनसंघर्ष विद्यार्थ्यांना यशाच्या वाटेत आदर्शदायी ठरणारा होता. परिसंवादात कष्टकरी आणि शेतकर्‍यांचे साहित्यातील चित्रण  मांडताना डॉ. कृष्णात खोत व डॉ. कृष्णा इंगोले यांनी प्रबोधन केले. कथाकथनकार आप्पासाहेब खोत यांनी गॅदरिंगचा पाहुणा या कथेतून रसिकांना खळखळून हसविले तर महापूर कथेतून डोळ्यात अश्रूही आणले. या कार्यक्रमातून साहित्य संमेलनाची उंची अधिकच वाढली. 

डॉ. नवनाथ शिंदे यांनी संत गाडगेबाबा यांचे जीवनदर्शन एकपात्री प्रयोगातून साकारले. जेष्ठ कवी प्रमोद कोपर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या  या संमेलनात निपाणी भागातील अनेक कवींनी दर्जेदार कविता सादर केल्या. आबा पाटील, नितीन चंदनशिवे, प्रमोद कांडर व रमजान मुल्ला यांच्या वास्तववादी कवितांना रसिकांनी मोठी दाद दिली.संमेलनाला कोणीही प्रायोजक नसताना  51 रूपयांपासून 51 हजारापर्यंतच्या मिळालेल्या  लोकवर्गणीतून संमेलन यशस्वी झाल्याचे मत स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. अच्युत माने यांनी व्यक्‍त केले.