Sun, Dec 15, 2019 03:14होमपेज › Belgaon › बंडखोर आमदारांविरुद्ध पक्षांतरबंदी कायदा लागू?

बंडखोर आमदारांविरुद्ध पक्षांतरबंदी कायदा लागू?

Published On: Jul 16 2019 1:55AM | Last Updated: Jul 16 2019 12:44AM
बंगळूर : प्रतिनिधी

काँग्रेसच्या विधिमंडळ बैठकीत इतर आमदारांनी बंडखोर आमदारांविरोधात  नाराजी व्यक्त केली. सर्व बंडखोरांना अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या व प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडुराव यांनी विधानसभा सभापतींकडे बंडखोरांविरुद्ध पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाईची मागणी केल्याचे समजते.

काही आमदार नाश्ता इथे करतात, जेवण मुंबईत करत असल्याचे सुनावण्यात आले. पक्षविरोधी कारवाया करणार्‍यांमुळे आज पक्षाला मान खाली घालण्याची वेळ आली आहे. ऑपरेशन कमळ अंतर्गत त्या आमदारांनी मोठ्या प्रमाणात रक्कम स्वीकारल्याची चर्चा आहे. यामुळे मतदारसंघात गेल्यानंतर आमदारांची विक्री होत असल्याचा आरोप केला जात आहे. कोणत्याही समस्या असल्या तरी पक्ष पातळीवर सोडवता येतात. पण, बंडखोरांना पक्षात ठेवून त्यांना अभय देऊ नये, त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी बैठकीत करण्यात आली.

नाराज आमदारांना अनेकदा बोलावणे पाठवले. त्यांच्याशी चर्चा केली. मंत्रिपद व इतर सवलतींचे आमिष दाखवण्यात आले. तरीही त्यांनी राजीनाम्याचा हट्ट धरला. माघारी परतले नाहीत. त्यांना चांगलाच धडा शिकवावा, या उद्देश वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याविरोधात पक्षांतरबंदी कायद्याचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्यामुळे कारवाई झाली तर संबंधितांना किमान सहा वर्षे कोणतीच निवडणूक लढता येणार नाही. त्यामुळे राजकीय भवितव्य धोक्यात येऊ शकते.