Sun, Dec 15, 2019 05:57होमपेज › Belgaon › एकच प्रश्‍न : सरकार कोसळले का?

एकच प्रश्‍न : सरकार कोसळले का?

Published On: Jul 07 2019 1:29AM | Last Updated: Jul 06 2019 11:47PM
बेळगाव : प्रतिनिधी

बंडखोर 11 आमदारांनी बंगळूरमध्ये शनिवारी राजीनामे सादर केल्यानंतर बेळगावमध्येही खळबळ माजली आहे. ज्याच्या त्याच्या तोंडी एकच प्रश्‍न होता; तो म्हणजे सरकार गडगडले का? अगदी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारीही हाच प्रश्‍न विचारत होते. दरम्यान, जिल्ह्यातील सार्‍या आमदारांचे लक्ष बंगळूरकडे लागले असून,  प्रत्येक घडामोडींवर ते बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे दुपारनंतर जिल्हाधिकार्‍यांसमेवत स्थानिक आमदार आणि रिक्षाचालकांची होणारी बैठक रद्द करण्यात आली. 

शनिवारी दुपारनंतर राजीनाम्यांचे वृत्त थडकल्यानंतर राजकीय चर्चांना ऊत आला. सरकारी कर्मचार्‍यांबरोबरच हॉटेल व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक आणि अगदी विद्यार्थीही ‘सरकारचे काय झाले?’ असा प्रश्‍न विचारत होते. तूर्त सरकार स्थिर असले तरी मंगळवारी सभापती आमदारांच्या राजीनाम्यावर काय निर्णय घेतात, यावर सरकारचे भवितव्य अवलंबून असेल. 

जिल्हाधिकार्‍यांनी शनिवारी सकाळी चिकोडी पूरस्थिती नियंत्रणासाठी अधिकार्‍यांची बैठक घेतली. पण त्या बैठकीला आमदार आणि राज्य सरकारचे मुख्य सचेतक गणेश हुक्केरी अनुपस्थित होते. ते बंगळूरकडे रवाना झाल्याचे समजते. 

चिकोडीच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी बेळगावला  परतले. दुपारनंतर रिक्षाचालकांनी जिल्हाधिकार्‍यांसमेवत चर्चा करण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी आमदारांना घेऊन रिक्षाचालक जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांना भेटणार होते. मात्र आमदार राजकीय घडामोडींमध्ये व्यस्त असल्याने ही बैठक होऊ शकली नाही.  विद्यार्थ्यांची ने-आण करणार्‍या रिक्षाचालकांनी किमान 8 विद्यार्थ्यांची ने-आण करण्याची परवानगी प्रशासनाकडे मागितली आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक होणार होती.

बंगळूरमध्ये राजकीय नाट्य घडत असले तरी स्थानिक आमदार बेळगावातच आहेत. अथणीचे महेश कुमठळ्ळी आणि गोकाकचे रमेश जारकीहोळी बंडखोरांसमवेत बंगळूरमध्ये आहेत. उर्वरित 16 आमदारांपैकी काँग्रेसचे काही आमदार बंगळूरमध्ये आहेत. मात्र भाजपचे सारे आमदार बेळगावातच असल्याचे समजते.