Mon, Aug 19, 2019 02:37होमपेज › Belgaon › रमेश जारकीहोळी नॉट रिचेबल

रमेश जारकीहोळी नॉट रिचेबल

Published On: Dec 26 2018 1:14AM | Last Updated: Dec 26 2018 1:14AM
बंगळूर : प्रतिनिधी

मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्याने नाराज असणारे आमदार रमेश जारकीहोळी नॉट रिचेबल असून ते अज्ञातस्थळी गेल्याचे वृत्त मंगळवारी सायंकाळी पसरले. दरम्यान, आपल्या निकटवर्तीय आठजणांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात यश मिळविलेले समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्यांच्या पाठीशी पक्षश्रेष्ठी असल्याचे समजते.

मंत्रिपदावरून डच्चू मिळाल्यानंतर आता आमदारपदीही राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. चार दिवसांत निर्णय घेणार असल्याचे सोमवारी त्यांनी जाहीर केले. याबाबत पक्ष वरिष्ठांशी किंवा इतरांशी आता चर्चा करण्यात येणार नसल्याचे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले. काही वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी मंगळवारी सायंकाळी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, ते कोणाच्याही संपर्कात आले नाहीत.

दरम्यान, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या आमदारांची मनधरणी करण्यात येत आहे. यामध्ये समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या यांनी प्रवेश केला असून ज्येष्ठ नेते रामलिंगारेड्डी तसेच इतर आमदारांशी चर्चा करून तूर्तास त्यांना थांबविण्यात यश मिळविले आहे. सिद्धरामय्यांनी नाराज आमदारांची भेट घेतली. काँग्रेस-निजद युती सरकारमध्ये सर्वच इच्छुकांना मंत्रिपद देणे शक्य झाले नसल्याची समजूत त्यांनी काढली. 

भाजपने रामलिंगारेड्डींशी संपर्क साधल्याचे समजल्यानंतर प्रदेश काँग्रेसमधील नेत्यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या.