Sun, Dec 08, 2019 16:31होमपेज › Belgaon › नूतनीकरणामुळे रेल्वे वेळापत्रकाचा बोजवारा

नूतनीकरणामुळे रेल्वे वेळापत्रकाचा बोजवारा

Published On: May 27 2019 1:32AM | Last Updated: May 26 2019 11:28PM
बेळगाव : प्रतिनिधी

रेल्वे रुळाचे नूतनीकरण आणि रेल्वे मार्ग दुहेरीकरणामुळे गेल्या चार दिवसांपासून रेल्वे वेळापत्रकाचा बोजवारा उडाला आहे. एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावत आहेत. त्यातच बेळगाव - मिरज येणा-जाणार्‍या सहा पॅसेंजर बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. ही परिस्थिती 30 मेपर्यंत राहील, असे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. 

बेळगाव-मिरज पॅसेंजरची सेवा स्थगित झाल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. एप्रिलमध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार होती. मात्र, रेल्वे ट्रॅक बदलण्याचे काम लांबल्याने ही सेवा आणखी किती दिवस बंद राहणार, हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. सध्यातरी 30 मेपर्यंत या गाड्या रद्द करण्यात आल्याचे स्टेशन मास्तरांना कळविण्यात आले आहे.  या विस्कळीत सेवेचा सुमारे आठ हजार प्रवाशांना फटका बसला आहे.     

बेळगाव - मिरज मार्गावरील जाणार्‍या तीन आणि येणार्‍या तीन अशा सहा पॅसेंजर रद्द करण्यात आल्या आहेत. जानेवारी ते एप्रिलपर्यंत चार गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. आता आणखी दोन पॅसेंजर रद्द करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र - कर्नाटक विशेषत: सीमाभाग जोडणार्‍या या गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल सुरु आहेत. 

मिरज ते बेळगाव दरम्यान प्रवास करणार्‍यांमध्ये कामगार, भाजी विक्रेते, छोटे व्यापारी, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक, व्यावसायिक, कर्मचारी आणि विद्यार्थी वर्गाची संख्या मोठी आहे. बेळगाव ते मिरज दरम्यान पंधरा रेल्वे स्टेशन आहेत. या स्टेशनमधून ये - जा करणार्‍यांसाठी ही पॅसेंजर खूप उपयुक्‍त आहे. या लहान स्टेशनवर एक दोन वगळता कोणत्याही एक्स्प्रेस गाड्या थांबत नाहीत. त्यामुळे या लहान स्टेशनवरुन आता प्रवाशांची ये जा जवळपास बंद आहे. याचा फटका जवळपास रोज प्रवास करणार्‍या आठ हजारहून अधिक प्रवाशांना बसला आहे. 

रेल्वे मार्गाचे नूतनीकरण आणि दुहेरीकरणाचा फटका लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांनाही बसला आहे. या गाड्या आता जवळपास तीन, तीन तास उशिराने सुटत आहेत.  याची पूर्वकल्पना प्रवासी स्टेशनवर अडकून पडत आहेत. रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण आणि नूतनीकरण 30 मेपर्यंत चालणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता अधिकार्‍यांकडून व्यक्‍त होत आहे.

बेळगावहून मिरजेला जाणार्‍या या गाड्या रद्द
  बळ्ळारी - मिरज : पहाटे 2.5 वा. 
  बेळगाव - मिरज : दुपारी 2.30 वा.
  हुबळी - मिरज : दुपारी 4 वा.

मिरजेहून बेळगावला येणार्‍या या गाड्या रद्द 
  मिरज- बेळगाव : दुपारी 1 वा.
  मिरज - लोंढा : सकाळी 9.20
  मिरज - बेळगाव : दुपारी 2.20