बेळगाव : प्रतिनिधी
रेल्वे विभागाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता मिरज-बेळगाव मार्गावरील रेल्वे वाहतूक दिवसभर पूर्णपणे ठप्प ठेवण्यात आल्याने सुमारे 4 हजारांपेक्षा अधिक प्रवासी दिवसभर रेल्वे स्थानकावर अडकून पडले होते. रेल्वे विभागाच्या या अनागोंदी कारभाराबद्दल प्रवाशांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या.
कुडची-चिंचलीदरम्यान रेल्वे रुळाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे मिरज-बेळगाव मार्गावर धावणार्या सर्व रेल्वे दिवसभर बंद ठेवण्यात आल्या होत्या. याबाबत रेल्वे विभागाकडून प्रवाशांना कोणतीच पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे नेहमीप्रमाणे रेल्वेने प्रवास करणार्या प्रवाशांची रेल्वे स्थानकावर तोबा गर्दी झाली होती. रेल्वे विभागाकडून योग्य माहिती देण्यात आली नसल्यामुळे प्रवासी संभ्रमावस्थेत होते. रात्री 8.30 वा. सेवा सुरू करण्यात आल्याने मिळेल त्या रेल्वेने प्रवाशांनी एकच गर्दी केली होती. रात्री 8.30 वा. बंगळूरकडे जाणार्या चन्नम्मा एक्स्प्रेस व दिल्लीकडे जाणार्या निजामुद्दीन एक्स्प्रेस रेल्वेला मोठी गर्दी केली होती. लांब पल्ल्याच्या प्रवाशांनी आरक्षित केलेल्या डब्यांसह सर्वसामान्य डब्यांमध्ये प्रवाशांनी जागा मिळविण्यासाठी चढाओढ केली.
दिवसभर रेल्वेच्या प्रतीक्षेत असणार्या प्रवाशांनी टीसीची कोणतीही सूचना न मानता मिळेल त्या डब्यात जागा मिळविण्यासाठी गर्दी केली होती. रेल्वे विभागाच्या या गैरसोयीबद्दल प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
याबाबत रेल्वे स्टेशनमास्तर सुधीर कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता सदर परिस्थिती 30 मेपर्यंत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.