Mon, Dec 09, 2019 11:01होमपेज › Belgaon › सरकार वाचवण्याची धडपड

सरकार वाचवण्याची धडपड

Published On: Jul 08 2019 1:41AM | Last Updated: Jul 08 2019 12:59AM
बंगळूर/नवी दिल्ली : प्रतिनिधी

‘काहीही करा; पण सत्ता राखा’, असा निरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना दिला आहे. दिल्ली विमानतळावर रविवारी सायंकाळी पोहोचल्यानंतर कुमारस्वामी यांनी राहुल गांधी यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला. त्यानंतर कुमारस्वामी बंगळूरकडे रवाना झाले.

शनिवारी काँग्रेसच्या आठ आणि निजदच्या तीन अशा 11 आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर कर्नाटकात राजकीय पेच निर्माण झाला आहे. हे बंडखोर आमदार भाजपशी हातमिळवणी करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास भाजप कुमारस्वामी सरकारविरुद्ध अविश्‍वास ठराव आणू शकते. तो आणला जाऊ नये, यासाठी काँग्रेस आणि निजद आघाडीचे नेते प्रयत्नशील आहेत. त्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून राहुल आणि कुमारस्वामी यांचे संभाषण झाल्याचे समजते. मुख्यमंत्री कुमारस्वामी गेले आठ दिवस अमेरिकेत होते. शनिवारी रात्रीच त्यांनी अमेरिकेहून प्रस्थान केले.

5 बंडखोर पुन्हा संपर्कात

शनिवारी 11 आमदारांनी राजीनामे दिले असले, तरी त्यापैकी 5 आमदार पुन्हा काँग्रेसच्या आणि माझ्या संपर्कात आहेत, असा दावा माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. मुनिरत्न, रेड्डी यांच्यासह ज्येष्ठ नेते संपर्कात आहेत, त्यांचे आम्ही मन वळवू, असे सिद्धरामय्यांनी पत्रकारांना सांगितले.

बंगळूर येथे धावाधाव; बंडखोरांचा मुंबईत ठाव

बंगळूर : शनिवारी आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर सरकार वाचवण्यासाठी बंगळूर आणि दिल्लीत काँग्रेसची धावाधाव सुरू असताना, बंडखोर आमदारांनी मात्र मुंबई गाठली आहे. मध्य मुंबईतील सॉफिटेल या सप्‍ततारांकित हॉटेलमध्ये या आमदारांची सोय करण्यात आली आहे. आपला या सगळ्या घडामोडींशी काहीच संबंध नसल्याचे भाजप नेते सांगत असले, तरी मुंबईतील भाजपच्या नेतृत्वाकडेच या आमदारांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.    

भाजपचे आमदार प्रसाद लाड हे सॉफिटेलमध्ये तळ ठोकून आहेत. या आमदारांवर कुणीही दबाव आणू नये, तसेच त्यांचा विचार बदलू नये, याची खबरदारी घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगण्यात आल्याचे कळते. ते आमदारांची भेट घेण्याची शक्यता आहे.

हॉटेलबाहेर काँग्रेसची निदर्शने

कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसच्या 8 आणि निजदच्या 3 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर ते मुंबईत थांबलेल्या सॉफिटेल हॉटेलसमोर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी आंदोलन केले. याप्रकरणी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरजसिंह ठाकूर यांना पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी सकाळी हे सर्व आमदार मुंबईत आले. काँग्रेसच्या आमदारांनी आपले राजीनामे मागे घ्यावेत, या मागणीसाठी हॉटेलसमोर कार्यकर्त्यांनी निदर्शने व घोषणाबाजी केली. पोलिसांनी सध्या तेथे चोख बंदोबस्त ठेवला असून, हॉटेलकडे जाणारे रस्ते  बंद केले आहेत.