Thu, Dec 05, 2019 21:09होमपेज › Belgaon › कणकुंबी, आमगाव परिसरात मुसळधार

कणकुंबी, आमगाव परिसरात मुसळधार

Published On: Jul 13 2019 1:37AM | Last Updated: Jul 12 2019 12:11AM
जांबोटी : वार्ताहर

राज्यातच सर्वाधिक पाऊस पडणार्‍या जांबोटी पश्‍चिम भागात यंदा गेल्या दहा वर्षात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून मलप्रभेनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. परिणामी नदी-नाल्यांच्या लगतच्या शेतीसह रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागातील दहा गावांचा चार दिवसांपासून संपर्क तुटलेलाच आहे. कणकुंबी आमगावमध्ये गुरुवारी सकाळी मुसळधार पाऊस झाला असून आमगावमध्ये सर्वाधिक 320 तर कणकुंबीत 271 मिमीपावसाची नोंद झाली आहे.

गेल्या आठवड्यापासून पाण्यात असलेल्या हब्बनहट्टीचे  स्वयंभू मारुती मंदीराच्या गुरुवारी कळसापर्यंत पाणी गेले. तर तब्बल दहा वर्षात आतापर्यंत तीनवेळा देवाचीहट्टी बंधारा पाण्याखाली गेला आहे. मंगळवारपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून गेल्या पंधरा दिवसापसून विजेचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे 35 खेडी अंधारात आहेत. 

मुसळधार पावसामुळे नदी-नाले पात्राबाहेर आल्याने लगतची शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. काही ठिकाणी जमीन तुटली काही ठिकाणी पाणी तुंबल्याने पीक कुजले आहे. 

ओंडक्यामुळे बंधार्‍यावर पाणी 

आधीच उंची कमी. शिवाय दरवाजांची रुंदी कमी असल्यामुळे मलप्रभा नदीवरील देवाचीहट्टी बंधारा पाण्याखाली जात आहे. याची देखबाल करणार्‍या कंत्राटदारांचे याकडे साफ दुर्लक्ष झाल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. गुरुवारी सकाळी या बंधार्‍यावर पाणी आल्याने दुपारपर्यंत संपर्क तुटला होता. खानापुरहून देवाचीहट्टी तोराळी गोल्याळीची बससेवा बंद होती.

मुसळधार पावसामुळे शेतीकाम करणे मुश्किल झाले आहे. नदी नाल्यांना पूर आल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. 
सखाराम धुरी,
शेतकरी देवाचीहट्टी