Thu, Dec 12, 2019 22:14होमपेज › Belgaon › कर्नाटकमध्ये ३८ टक्के जनतेचा काँग्रेसला कौल

कर्नाटकमध्ये ३८ टक्के जनतेचा काँग्रेसला कौल

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 08 2018 1:53AMबंगळूरः वृत्तसंस्था

लोकनीती-सीएसडीएस आणि ‘एबीपी न्यूज’ने केलेल्या ताज्या सर्वेक्षणात कर्नाटकातील 38 टक्के जनतेचा काँग्रेसला कौल असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसला 92 ते 102 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर 79 ते 89 जागांसह भाजप दुसर्‍या स्थानी राहण्याची शक्यता आहे. मतांच्या टक्केवारीतही 38 टक्के मतांसह काँग्रेस पहिल्या स्थानी राहील, तर भाजपला 33 टक्के मते मिळतील, असा अंदाज आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कामकाजावर नागरिक समाधानी असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

विधानसभेसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे, तर कर्नाटकात कोण राज्य करणार, याचा फैसला 15 मे रोजी होणार आहे. त्यापूर्वी ‘एबीपी न्यूज’ने लोकनीती-सीएसडीएस सोबत मिळून 27 एप्रिल ते 3 मे दरम्यान 56 विधानसभा मतदार संघांमधील 244 बुथवर जाऊन 4 हजार 929 मतदारांची मते जाणून घेतली. त्या सर्वेक्षणाच्या आधारे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. या सर्वेक्षणातून जनता दलाची (जेडीएस) भूमिका सत्ता स्थापनेत महत्त्वाची ठरणार असल्याचे दिसते.  काँग्रेस किंवा भाजप कुणालाही ‘जेडीएस’च्या मदतीशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही, असे सर्वेक्षणातील आकड्यांवरून दिसते. ‘जेडीएस’च्या खात्यात 22 टक्के मते जातील, असे दिसतेय. कर्नाटकात इतर पक्षांच्या वाट्याला अवघ्या एक ते सात जागा येऊ शकतात.

सिद्धरामयांच्या कारभारावर 72 टक्के जनता समाधानी

सिद्धरामय्या सरकारच्या कामकाजावर 72 टक्के जनता समाधानी आहे. मोदी यांच्या सरकारची कामगिरी उत्तम किंवा चांगली असल्याचेही 68 टक्के जनतेला वाटते. भाजप हा सर्वाधिक भ्रष्ट असल्याचे मत 44 टक्के लोकांनी नोंदविले आहे, तर 41 टक्के लोकांना काँग्रेस सर्वात भ्रष्ट पक्ष वाटतो. ज्या लिंगायत समाजाच्या मतांभोवती प्रचाराचे वातावरण फिरत आहे, त्यांची मते भाजपच्या पारड्यात जातील, असे 68 टक्के लोकांचे मत आहे. 18 टक्के लोकांना लिंगायत काँग्रेसच्या बरोबर असेल, असे वाटते.