Sat, Dec 14, 2019 06:15होमपेज › Belgaon › शिक्षण व्यवस्थेला खासगीकरणाचा धोका

शिक्षण व्यवस्थेला खासगीकरणाचा धोका

Published On: Jun 18 2019 2:03AM | Last Updated: Jun 18 2019 12:20AM
बेळगाव : प्रतिनिधी

राज्यव्यवस्था बदलाबरोबर अर्थ व्यवस्था बदलते. याचा परिणाम शिक्षण व्यवस्थेवर होतो. राज्यकर्त्यांच्या धोरणाचा परिणाम शिक्षणव्यवस्थेवर होतो. खासगीकरणाचा धोका शिक्षणक्षेत्राला सर्वाधिक बसणार असून   पहिला फटका मुलींच्या शिक्षणाला बसणार असल्याचे मत प्रा. आनंद मेणसे यांनी व्यक्त केले.

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी,  राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी प्रा. आनंद मेणसे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. प्रा. मेणसे यांनी शिक्षण, शिक्षक व सद्य सामाजिक परिस्थिती या विषयावर व्याख्यान दिले.

व्यासपीठावर मराठी प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सरचिटणीस सुभाष ओऊळकर उपस्थित होते. प्रा. मेणसे यांना भाई माधवराव बागल पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रबोधिनीच्यावतीने सत्कार करण्यात आला.

प्रा. मेणसे म्हणाले, राज्यकर्त्यांच्या धोरणानुसार खाजगीकरणाला उत्तेजन मिळत आहे. यातून शिक्षण व्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे. याविरोधात प्रत्येकांने व्यक्त होण्याची गरज आहे. 

 शिक्षण व्यवस्थेकडे भारतात पुरेशा गांभीर्याने पाहण्यात येत नाही. जीवनातील प्रमुख घटक शिक्षण आहे. परंतु याचीच हेळसांड होत आहे. हे धोकादायक आहे. देशाच्या अंदाजपत्रकात शिक्षणावर केवळ 2.31 टक्के तरतूद करण्यात येते. एकूण खर्चाच्या किमान 6 टक्के तरतूद शिक्षणावर होणे आवश्यक असल्याचे मत युनेस्कोचे आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. 

बालशिक्षण हे सर्वाधिक महत्त्वाचे असते. सहा वर्षापर्यंत मुलांची जडणघडण होत असते. याकाळात मुलांना चांगल्या सुविधा मिळणे गरजेचे असते. परंतु भारत सरकारने ही जबाबदारी झटकली आहे. त्याऐवजी पहिली ते आठवीपर्यंत शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. बालशिक्षणावर भर देण्याची गरज आहे. हा खर्च नसून भविष्यासाठी केलेली गुंतवणूक असते. 

शिक्षणामुळे समाजातील वेगवेगळे घटक एकत्र येतील, अशी अपेक्षा करण्यात येत होती. परंतु हे स्वप्न उद्ध्वस्त झाले आहे. समाज एकमेकापासून दूर जात आहे. नवश्रीमंत वर्ग समाजापासून झपाट्याने दूर जात आहे. यातून अनावश्यकरित्या केंद्रिय, सीबीएसई, इंटरनॅशनल शाळांचा जन्म होत आहे. शिक्षण हा पैशा कमावण्याचा व्यवसाय झाला आहे.

मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी जात कोणती पुसू नका, हे गीत सादर केली. हार्मोनियम साथ सहदेव कांबळे, तबलावादन नारायण गणाचारी यांनी केले. प्रास्ताविक जयंत नार्वेकर यांनी केले. सूत्रसंचालन शीतल बडमंजी यांनी केले. इंद्रजित मोरे यांनी आभार मानले.