Mon, Sep 16, 2019 05:31होमपेज › Belgaon › ‘हिंडलगा’तून कैदी पसार

‘हिंडलगा’तून कैदी पसार

Published On: Apr 23 2019 1:33AM | Last Updated: Apr 23 2019 1:33AM
बेळगाव : प्रतिनिधी

हिंडलगा कारागृहाची तटबंदी चढून कैदी फरारी झाला. सोमवारी रात्री 7 च्या सुमारास ही घटना घडल्यानंतर कारागृह प्रशासनाची एकच भंबेरी उडाली. तटबंदी चढण्यासाठी त्याने  अंथरूणाचा वापर दोरीसारखा केल्याची माहिती मिळाली. हा कैदी खूनप्रकरणात फाशीची शिक्षा सुनावलेला आहे.

सुमारे 1200 हून अधिक कैदी असलेले हिंडलगा कारागृह राज्यातील मोठे कारागृह समजले जाते. राज्यभरातील नामचिन गुंडांसह फाशीचे कैदी या ठिकाणी आहेत. कारागृहाची तटबंदी सुमारे 20 फूट उंचीची आहे. परंतु, कारागृह व्यवस्थापनालाच आव्हान देत सोमवारी रात्री एका कैद्याने पलायन केले. 

रात्री 7 च्या सुमारास सर्व कैद्यांना बाहेर सोडण्यात आले होते. कैदी पाय मोकळे करण्यासाठी फिरत होते, तर काही जण गप्पा मारत बसले होते. यावेळी एक कैदी पलायनाची तयारी करीत असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. 

हूक, पँट अन् बरेच काही 

कैद्याने पळून जाण्यासाठी कारागृहात कैद्यांना जे साहित्य मिळते, त्याचा पुरेपूर वापर केला आहे. स्वत:च्या पँटा, एक लोखंडी हूक, अंथरुण-पांघरुण यासह अन्य साहित्य त्याने वापरले. पँटा व अंथरुण एकमेकाला जोडून त्याला वर हूक जोडले. हे हूक तटबंदीच्या तारेवर अशा ठिकाणी टाकले की जेथून स्वच्छतागृहाच्या पाईप्स गेल्या होत्या. या पाईपचा तसेच बनविलेल्या दोरीचा आधार घेत तो कैदी यावरून चढून वर गेला. तेथून त्याने उडी मारून पलायन  केल्याचे सांगण्यात येत आहे. 

पोलिसांसमोर आव्हान

दोन आठवड्यांपूर्वी पोलिस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार व गुन्हे विभागाच्या डीसीपी यशोदा वंटगोडी यांनी कारागृहाची पाहणी केली होती. परंतु त्यांना काहीच सापडले नव्हते. आता चक्क कैद्याने पलायन केल्याने कारागृह प्रशासनासह शहरातील पोलिस अधिकार्‍यांचीही झोप उडाली आहे. याबाबत पोलिस आयुक्त व कारागृह अधीक्षक टी. पी. शेष यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोबाईल घेतला नाही. 

कोळेगल खून प्रकरणातील आरोपी 
बंगळूर जवळील चामराजनगर जिल्ह्यात कोळेगल तालुका आहे. काही वर्षापूर्वी तेथे खूनप्रकरण घडले होते. या प्रकरणात जन्मठेप झालेला हा  कैदी असल्याचे समजते. 

हॉस्पिटलवर नजर
हिंडलगा कारागृहाची तटबंदी सुमारे 20 फूट उंच आहे. त्यावर तारेचे कुंपण आहे. इतक्या उंच चढून कैद्याने पलायन केले. इतक्या उंचीवरून उडी मारल्याने तो जखमी झाला असावा, अशी पोलिसांना शंका आहे.  त्यामुळे शहरातील सर्व हॉस्पिटलवर नजर ठेवण्याची सूचना वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी सर्व ठाण्याच्या अधिकार्‍यांना दिली आहे.