Mon, Jan 20, 2020 09:22होमपेज › Belgaon › प्रचारधुमाळी समाप्‍त

प्रचारधुमाळी समाप्‍त

Published On: Apr 17 2019 2:03AM | Last Updated: Apr 16 2019 11:21PM
बंगळूर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील चौदा मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी (दि. 18) सकाळी 7  ते सायंकाळी 6 पर्यंत होणार आहे. 

शांततेत आणि मुक्‍त वातावरणात मतदान पार पाडण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी बुधवारी सायंकाळी निवडणूक साहित्यासह संबंधित मतदान केंद्रांकडे जाणार आहेत. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी जाहीर प्रचारधुमाळी समाप्‍त झाली. आता घरोघरी जाऊन प्रचार करता येणार आहे. या निवडणुकीत निजदचे सर्वेसर्वा माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, केंद्रीय मंत्री सदानंदगौडा, राज्याचे ग्रामीण विकास मंत्री कृष्ण बैरेगौडा, मुख्यमंत्रीपुत्र निखिल कुमारस्वामी, सुमलता अंबरीश, माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांच्यासह दिग्गज नेत्यांचे राजकीय भविष्य ठरणार आहे.

उडपी-चिक्‍कमगळूर, हासन, म्हैसूर, चित्रदुर्ग, तुमकूर, मंड्या, चामराजनगर, बंगळूर ग्रामीण, बंगळूर दक्षिण, बंगळूर उत्तर, बंगळूर मध्य, चिक्‍कबळ्ळापूर, कोलार, मंगळूर येथे मतदान होईल. एकूण 241 उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यासाठी एकूण 30,197 मतदान केंद्रे आहेत. यापैकी 6,318 संवेदनशील आणि 23,874 केंद्रे सामान्य आहेत. अतिसंवेदनशील केंद्रांच्या परिसरात सीआरपीएफ जवान तैनात केले आहेत.

निवडणूक सुरक्षेसाठी 90,997 पोलिस तैनात करण्यात आले आहेत. 3,313 भरारी पथके, 851 प्रभारी गस्त पथके, 307 डीएसपी संचारी पथके, 916 गस्त घालणारी पथके, 827 स्थिर पथके, 10 सुरक्षा खोल्यांसाठी केंद्रीय पथकांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये राज्याच्या कोणत्याही भागामध्ये नक्षली कारवाया झालेल्या नाहीत. तरीही कर्नाटकातील मलेनाडू भाग, कर्नाटक, केरळ तमिळनाडू यांना जोडणार्‍या प्रदेशात दररोज नियमित गस्त सुरू आहे. संवेदनशील मतदान केंद्र परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

आठ वर्षांत कोणत्याही भागात नक्षली कारवाई झाली नाही. निवडणुकीविरोधात पत्रके वाटणे, जाहीर सभा घेणे अशा कारवाया झालेल्या नाहीत. संवेदनशील ठिकाणी आवश्यक बंदोबस्त केला आहे. - नीलमणी राजू, राज्य पोलिस महासंचालक