होमपेज › Belgaon › पोलिस दंड वसुलीत, दुचाकीस्वार विनाहेल्मेट

पोलिस दंड वसुलीत, दुचाकीस्वार विनाहेल्मेट

Published On: Feb 06 2019 1:43AM | Last Updated: Feb 05 2019 10:32PM
बेळगाव : प्रतिनिधी

वाहतूक पोलिस दंड वसुलीत मग्न असल्याने हेल्मेटसंबंधी जागृतीकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे शहरात अनेक दुचाकीस्वार विनाहेल्मेट दिसत आहे. हेल्मेटची सक्ती करण्यात आली असली तरी यांची गांभीर्याने अंमलबजावणी होताना दिसत नाही.  

शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतूक  पोलिसांकडून विना कागदपत्रे, विना हेल्मेट, विना सिटबेल्ट आढळल्यास त्या वाहनचालकावर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. मात्र, फक्त कारवाईत मग्न असलेल्या वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट जागृतीबाबत उदासीन भूमिका दिसून येत आहे.

विनाहेल्मेट दुचाकीस्वारांकडून शहरातील गल्लीबोळाचा वापर केला जात आहे.  वाहतूक नियमांचे पालन करण्यासंबंधी वाहतूक विभागाने शहरात काही ठिकाणी जागृतीचे फलक लावले आहेत. मात्र, जागृतीसंबंधी इतर उपक्रम राबविण्याकडेे दुर्लक्ष केले आहे. 

धर्मवीर संभाजी चौक, यंदेखुट, चन्नमा सर्कल, अशोक सर्कल, गोवावेस, काँग्रेस रोडसह आदी ठिकाणी वाहतूक पोलिस वाहनचालकांवर कारवाई करतात. सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही वाहनधारकांकडून दंड वसूल केला.