Tue, Dec 10, 2019 13:44होमपेज › Belgaon › जनतेच्या सोयीसाठी मराठीतूनही फलक लावा

जनतेच्या सोयीसाठी मराठीतूनही फलक लावा

Published On: Jun 30 2019 1:07AM | Last Updated: Jun 29 2019 11:56PM
खानापूर : प्रतिनिधी

खानापूर तालुक्यात मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने भाषेच्या अडचणीमुळे शासकीय योजनांच्या लाभापासून गोरगरीब जनता वंचित राहण्याचा प्रकार घडतो. योजनांची माहिती सर्वसामान्यांना वेळेत कळावी. यासाठी तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कन्नडबरोबरच मराठी भाषेतूनही माहिती व सूचना फलक लावावेत, अशी सूचना आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी 
केली.

शहर व तालुक्यात शासकीय स्तरावर मराठी भाषेला डावलण्यात येत असल्याची बाब चार दिवसापूर्वी दै. पुढारीतून निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्याची दखल घेत आ. डॉ. निंबाळकर यांनी तहसीलदार कार्यालयात महसूल विभागासह विविध विभागांच्या अधिकार्‍यांना नियमानुसार मराठी भाषेचाही योग्य वापर करण्यात यावा, असे फर्मान बजावले.

आ. निंबाळकर यांनी तहसीलदार कार्यालयात फेरफटका मारून विविध विभागातील कामांची पाहणी केली. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला विविध शासकीय योजनांची माहिती देणारे फलक पाहिले असता सदर दोन्ही फलक केवळ कन्नड भाषेतूनच लावण्यात आल्याचे दिसून आले. या कार्यालयात कामानिमित्त येणारे बहुतांश लोक मराठी भाषिक असल्याने त्यांना कन्नडमधील फलक वाचता येत नाहीत. त्यामुळे शासकीय योजना तसेच सरकारी प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी आवश्यक असलेली माहिती समजत नसल्यामुळे मोठी गैरसोय होते. त्याकरिता लोकांना समजेल अशा त्यांच्या सोयीच्या भाषेत सूचना फलक लावण्यात यावेत, असे अधिकार्‍यांना सांगितले.

शासकीय अधिकारी लोकांच्या सेवेसाठी आहेत. त्यामुळे संबंधित खात्याची परिपूर्ण माहिती जनतेला  कळणे आवश्यक आहे. मराठी भाषेतूनही जनतेला माहिती देण्यास काहीच अडचण नसून अधिकार्‍यांनी जनतेला सोयीचे ठरेल असे वर्तन करावे, असे सुनावले. आठ दिवसांत या आदेशाची अंमलबजावणी करावी, अशी सक्त सूचनाही केली.

बसवरही मराठी नामफलक लावा

खानापूर बस आगारातून लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागात अनेक बस धावतात. या बसमध्ये कार्यरत वाहक कन्नड भाषिक आहेत. परंतु बहुतांश लोक मराठी भाषा अवगत असणारे असल्याने  गैरसोय होते. भाषेच्या अडचणीमुळे आठवडाभरापूर्वी चापोली गावच्या ज्येष्ठ व्यक्तीला अपमानास्पद वागणुकीला सारोरे जावे लागले. या प्रकाराची तक्रार आपल्यापर्यंत आली असल्याने असे प्रकार रोखायला हवेत,असे त्यांनी सांगितले.