Sun, Dec 08, 2019 16:33होमपेज › Belgaon › अधिवेशनातही विद्यमान मंत्रिमंडळच राहणार कायम

अधिवेशनातही विद्यमान मंत्रिमंडळच राहणार कायम

Published On: Jul 11 2019 1:29AM | Last Updated: Jul 11 2019 12:56AM
बंगळूर : प्रतिनिधी

नाराज आमदारांनी राजीनामे दिल्याने काँग्रेस-निजद आघाडी सरकारच्या सार्‍या मंत्रिमंडळाने राजीनामा दिला. मुंबईतील रिसॉर्टमध्ये असणार्‍या नाराजांना मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली. पण, मंत्र्यांचे राजीनामे राज्यपालांपर्यंत पोचलेले नाहीत. काँग्रेसमधील मंत्र्यांचे राजीनामे समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या यांच्याकडे आहेत. तर निजद मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्याकडे आहेत. त्यामुळे मंत्र्यांनी राजीनामे दिले तरी ते राज्यपालांपर्यंत पोचलेले नाहीत की मंत्रिमंडळ बरखास्त झालेले नाही. 

काही मंत्र्यांनी आपापल्या खात्याची कामे नियमितपणे सुरु ठेवली आहेत. निविदा मंजूर करणे, फायल निकालात काढणे, बढतीचा निर्णय आदी कामे ते करत आहेत. सध्या नाराज आमदारांची मनधरणी केली जात आहे. सभापती के. आर. रमेशकुमार यांनी तेरा आमदारांपैकी पाच आमदारांचे राजीनामे नियमानुसार असल्याचे सांगितले आहे. उर्वरित आठ जणांना नियमानुसार राजीनामे सादर करण्याची नोटीस बजावली आहे. त्यासाठी त्यांना 12 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत मंत्रिमंडळ बरखास्त होणार नाही की कोणत्या मंत्र्याचा राजीनामा मंजूर केला जाणार नाही. 

नाराज आमदारांचे प्रकरण लवकर संपुष्टात येण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे विद्यमान मंत्रिमंडळच पावसाळी अधिवेशन काळात कायम राहणार आहे. नाराजांची मनधरणी यशस्वी झाल्यास केवळ काही मंत्र्यांचेच राजीनामे मंजूर केले जातील. संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होणार नाही. काही मंत्र्यांना त्यांच्या पदावर कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे.

मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. पण, नियमानुसार ते मंजूर होईपर्यंत सर्व मंत्री आपल्या पदावर कायम असणार आहेत. त्यामुळे आपल्या खात्याचे काम ते पाहू शकतात.
-सिद्धरामय्या अध्यक्ष, समन्वय समिती