Thu, Dec 12, 2019 22:12होमपेज › Belgaon › पालक शाळेच्या दारात, पोलिस घरात!

पालक शाळेच्या दारात, पोलिस घरात!

Published On: Jun 28 2019 1:32AM | Last Updated: Jun 27 2019 11:51PM
 बेळगाव : प्रतिनिधी

वर्दी रिक्षाचालकांनी तीन दिवस रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शाळांजवळ पालक गर्दी करणार, याची माहिती असूनही वाहतूक पोलिस यंत्रणा ढिम्म बनल्याचे गुरूवारी दिसून आले. कारण, शहरातील सर्व शाळा आणि मुख्य चौकांमध्ये पोलिस नसल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. 

गुरूवारी शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी दिसत होती. सकाळच्या टप्प्यात गोवावेस सर्कलजवळ वाहतूक कोंडी होती. दोननंतर बहुतांश शाळांजवळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली. शहर परिसरातील सेंट मेरिज, सेंट जोसेफ, सेंट झेविअर्स, महिला विद्यालय, डीपी स्कूल या ठिकाणी  वाहतूक कोंडी दिसून आली. या ठिकाणी वाढलेल्या वाहनांचा परिणाम ग्लोब सर्कल, संचयनी सर्कलजवळील पेट्रोल पंप, गोगटे सर्कल, अंबाभुवन या ठिकाणी दिसून आला. 

सर्वच रस्त्यावर कोंडी होऊनही बहुतांश ठिकाणी वाहतूक पोलिसच नव्हते. कोणी कसेही वाहन समोर आणून थांबत होते. त्यामुळे सुमारे तासभर वाहने अडकून पडली. पोलिसांचे दुर्लक्ष  वर्दी रिक्षांनी तीन दिवस बंद पुकारल्यामुळे शाळांजवळ कोंडी होणार, हे निश्‍चित होते. परंतु, पोलिस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार व वाहतूक व गुन्हे विभागाच्या डीसीपी यशोदा वंटगोडी यांनी पोलिस बंदोबस्ताचे कसलेच नियोजन केल्याचे  दिसले नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी पोलिस होते तेथे काही वेळानंतर कोंडी हटली. परंतु, अनेक ठिकाणी वाहनधारकांना अर्धा ते एक तास अडकून पडावे लागले. 

चारचाकींमुळेही कोंडी

पावसाचे दिवस आणि रिक्षा बंद यामुळे बहुतांश पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीऐवजी चारचाकी बाहेर काढल्या होत्या. कसेही वाहन घुसडवत पुढे जाण्याचा अट्टाहास आणि या वाहनांमध्ये घुसणारे दुचाकीस्वार यामुळे कोंडी कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत होती.