Mon, Dec 09, 2019 11:01होमपेज › Belgaon › पीओपी श्री मूर्तींना परवानगी मिळणार का?

पीओपी श्री मूर्तींना परवानगी मिळणार का?

Published On: Jul 01 2019 1:10AM | Last Updated: Jun 30 2019 9:51PM
बेळगाव : प्रतिनिधी

दोन महिन्यांवर गणेशोत्सव आल्यानंतर पीओपी श्री मूर्तींवर कारवाई करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. महापालिकेत शनिवारी झालेल्या बैठकीत  मूर्तिकारांनी शाडूच्या मूर्ती बनवाव्यात अशी सूचना करण्यात आली असून पीओपी मूर्ती आढळल्यास जप्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मूर्तिकारांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन तोडगा काढण्याची मागणी केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दि. 1 रोजी बैठक होणार असून या बैठकीत कोणता निर्णय होणार याकडे मूर्तिकार- विक्रेत्यांचे लक्ष लागले आहे. 

गतवर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी एस. झियाऊल्ला यांनी 21 दिवसांवर गणेशोत्सव आल्यानंतर पीओपी मूर्ती जप्त करण्याचा इशारा दिला होता.त्यामुळे मूर्तिकार व विक्रेत्यांमध्ये खळबळ माजली होती. बेळगावात मोठ्या प्रमाणात परराज्यातून पीओपी श्री मूर्ती विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्या आहेत. विक्रेत्यांसह मूर्तिकारांनी लाखो रुपयाची गुंतवणूक या व्यवसायात केली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी जानेवारीपासून मूर्तिकारांकडे मूर्तीची ऑर्डर दिली आहे. त्याप्रमाणे मूर्ती तयार झाल्या असून रंगकाम सुरु आहे. जर मूर्ती जप्त केल्या तर एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक मूर्ती उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे मूर्तींची टंचाई निर्माण होईल. याला जबाबदार प्रशासन राहणार असून ऐन गणेशोत्सव काळात गणेश भक्तांसह सार्वजनिक उत्सव मंडळांसमोर मूर्ती कोठून आणावी, हा प्रश्‍न उभा राहणार आहे.

बेळगावमध्ये मूर्ती विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलाव आहेत. त्यामुळे प्रदूषण होण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. गणेशोत्सव तोंडावर आल्यानंतर कारवाई करणे चुकीचे आहे. प्रशासनाने ऐनवेळी निर्णय न घेता मूर्तिकारांच्या समस्या जाणून घ्याव्यात. एकच निर्णय सर्वाना लागू करावा.
मनोहर पाटील, अध्यक्ष मूर्तिकार संघटना बेळगाव

प्रशासनाने गतवर्षी शाडूच्या गणेशमूर्ती तयार करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात शाडूच्या ‘श्रीं’च्या मूर्ती तयार केल्या आहेत. मात्र ऐनवेळी पीओपीच्या तयार मूर्ती परराज्यातून शहरात दाखल झाल्या. त्यामुळे शाडूच्या मूर्तींची विक्री झाली नाही. त्याला जबाबदार कोण?
मारुती कुंभार, मूर्तिकार

मूर्तिकारांवर कारवाई करावयाची ही वेळ नाही. गणेशोत्सव झाल्यानंतर लगेचच आदेश बजावला असता तर मूर्तिकारांनी शाडूच्या मूर्ती बनविल्या असत्या. जानेवारी महिन्यापासूनच गणेशमूर्ती बनविण्यासाठी ऑर्डर येत असतात. त्यामुळे प्रशासनाने याबाबत विचारविनिमय करावयास हवा. 
विशाल गोदे, मूर्तिकार

प्रदूषण नियंत्रण मंडळ व प्रशासनाच्या आदेशामुळे बेळगावातील मूर्तिकार कचाट्यात सापडला आहे. प्रशासनाने कारवाई करण्याची ही वेळ नाही. परराज्यातील मूर्तीदेखील तयार करण्यात आल्या आहेत. जर कारवाई झाली तर गणेशभक्तांच्या भावना दुखावतील. त्यानंतर निर्माण होणार्‍या परिस्थितीला प्रशासनच जबाबदार राहील.
मिलिंद लोहार, मूर्तिकार