बेळगाव : प्रतिनिधी
दहावी, बारावी अथवा पदवीला पैकीच्या पैकी गुण मिळणे, ही बाब तशी दुर्मीळच. परंतु, यावरही मात करून काहीजण एखाद्या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवतात. परंतु, 100 पैकी 101 गुण मिळाले तर....! ही जर तरची बाब नसून अथणीच्या के. ए. लोकापूर कॉलेजमधून बीकॉम शेवटच्या वर्षात शिकणार्या एका विद्यार्थिनीला चक्क 101 गुण देण्यात आले आहेत. चन्नम्मा विद्यापिठातील मूल्यमापकानी असा प्रताप केल्याचे स्पष्ट झाले आहे.
अथणीतील के. ए. लोकापूर कॉलेजमध्ये बीकॉममध्ये शिकणार्या शैलश्री सावगाव हिचा सहाव्या सेमिस्टरचा नुकताच निकाल लागला. ऑनलाईन निकाल पाहिल्यानंतर तिला धक्काच बसला. कारण, तिला मॉडर्न ऑडिटिंग अॅन्ड प्रॅक्टिसेस या विषयात चक्क 100 पैकी 101 गुण मिळाल्याचे गुणपत्रिकेत नमूद होते. चन्नम्मा विद्यापीठाने तिला फक्त 101 गुण दिले नाहीत, तर तिची ही गुणपत्रिका ऑनलाईन अपलोड केली. यामध्ये तिला प्रक्टिकलसाठी पैकीच्या पैकी 20 गुण दिले असून, उर्वरित 80 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी 81 गुण दिले आहेत. त्यामुळेच हा चर्चेचा विषय ठरला. शैलश्रीला एकूण 70 टक्के गुण मिळाले आहेत. परंतु, एकाच विषयात तिला 101 गुण पाहून तिने ही गुणपत्रिका आपल्या पालकांना दाखविली. त्यांनाही याबाबत आश्चर्य वाटल्याने त्यांनी थेट कॉलेज गाठले. येथील व्यवस्थापनाशी चर्चा करून घडला प्रकार प्राचार्यांच्या कानावर घातला. त्यांनी नेमके काय घडले, याची शहानिशा करून सांगू, असे सांगून पालक व विद्यार्थिनींचे समाधान करून पाठवून दिले.
ऑनलाईन गुणपत्रिका गायब
कॉलेज व्यवस्थापनाने ही बाब चन्नम्मा विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिली. ही गंभीर चूक लक्षात येताच विद्यापीठाने शैलश्रीची ऑनलाईन गुणपत्रिकाच काढून टाकली. यानंतर शैलश्रीला आपल्याला नेमके गुण किती पडले, याबाबत उत्सुकता होती. म्हणून तिने पुन्हा ऑनलाईन पाहिले. परंतु, अद्याप तिची गुणपत्रिका अपलोड केलेली नाही. त्यामुळे तिला नेमके किती गुण आहेत, हे अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे.
अथणीतील के. ए. लोकापूर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा निकाल तांत्रिक कारणामुळे चुकीचा प्रसिद्ध झाला आहे. चूक लक्षात आल्यानंतर तत्काळ दुरुस्ती केली आहे. विद्यार्थिनीपर्यंत योग्य निकाल पोहोचला आहे.
- रंगराज वनदुर्ग, कुलसचिव, मूल्यमापन