Mon, Dec 09, 2019 11:05होमपेज › Belgaon › वर्षभरात मनपाच्या केवळ चारच बैठका

वर्षभरात मनपाच्या केवळ चारच बैठका

Published On: Jan 08 2019 1:41AM | Last Updated: Jan 07 2019 10:41PM
बेळगाव : प्रतिनिधी 

महापालिकेत वर्षाकाठी महिन्याला एकप्रमाणे 12 सर्वसाधारण बैठका होणे आवश्यक आहे. मात्र  यंदा  केवळ चारच बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एका बैठकीत मराठी नगरसेवकांनी सभात्याग केला होता. बैठकांच्या माध्यमातून विविध विषय मांडून त्यावर चर्चा होणे आवश्यक असते. मात्र, नियोजनाअभावी बैठकांचे आयोजन होत नसल्याचे समोर आले आहे.

1 मार्च 2018 रोजी महापालिकेची महापौर, उपमहापौर निवड झाली. त्यानंतर दहा महिन्याच्या कालावधीत केवळ चारच बैठकांचे आयोजन करण्यात आले. सर्वसाधारण बैठकीला 58 पैकी 47  नगरसेवक हजेरी लावत होते. दुपारनंतर ही संख्या 25 वर येत होती. तरीदेखील कोरम पूर्ण नसताना घाईगडबडीत विषय वाचून तर काही विषय न वाचताच मंजुरी देण्यात महापौर बसाप्पा चिकलदिन्नी आघाडीवर राहिले आहेत.

शुक्रवारी  सर्वसाधारण बैठकीत सफाई कामगारांच्या पगारावरुन वादंग उठले. भाडेतत्त्वावर टिप्पर, ऑटो टिप्पर कंत्राटी पद्धतीवर घेण्यासाठी अंदाजपत्रक सादर करण्यात आले. दुपारनंतर तीन क्रमांकाच्या मुद्द्यावरुन थेट महापौर महापौर क्रीडास्पर्धा आयोजनाचा मुद्दा महापौरांनी स्वत:च मंजुरीसाठी उचलून धरला. तीन मिनिटांत त्याला मंजुरी देऊन मोकळे झाले. त्यानंतर पाच वाजता तिसर्‍या रेल्वे गेटपासून पिरनवाडीपर्यंत गेलेल्या रस्त्याला मंत्री सतीश जारकीहोळी यांचे नाव द्यायचे ठरले. शिवाजीनगरात नव्याने निर्माण केलेल्या उद्यानाला जिजाऊ उद्यान नामकरण करावे, असा ठराव देखील संमत झाला. 

शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना करण्यासंबंधी आरोग्य स्थायी समिती अध्यक्षा सुधा भातकांडे यांनी प्रयत्न केला. मात्र तो विषय न ऐकताच महापौरांनी मंजूर झाला, असे जाहीर केले. यापूर्वी झालेल्या बैठकीत राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा बसविणे यावर चर्चा झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात सर्वसाधारण बैठकीत चर्चा झाल्याप्रमाणे कोणत्याच कामाला सुरुवात झालेली नाही.