Sun, Dec 08, 2019 16:44होमपेज › Belgaon › जिल्ह्यात पेरणीच्या कामाचे वाजले ‘बारा’

जिल्ह्यात पेरणीच्या कामाचे वाजले ‘बारा’

Published On: Jun 26 2019 1:38AM | Last Updated: Jun 25 2019 10:37PM
बेळगाव : अंजर अथणीकर

वळीव पावसाची पाठ आणि लांबलेला मान्सून यामुळे जिल्ह्यात आतापर्यत खरिपाची केवळ 12 टक्के पेरणी झाली आहे. गतवर्षी या दिवसापर्यंत 61 टक्के पेरणी झाली होती. यामुळे आता उडीद, सोयाबीन मूग या पिकांना यावर्षी फटका बसण्याची शक्यता असून, मक्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. 

यावर्षी जिल्ह्यामध्ये वळीव पाऊसच बरसला नाही. 1 मार्च ते 31 मे 2019 अखेर पावसाची सरासरी 106 मी. मी. असताना केवळ 31 मी. मी. पाऊस बरसला आहे. जवळपास 71 मी. मी. पाऊस कमी झाला आहे. जिल्ह्यामध्ये उडीद, सोयबीन आणि मुगाची पेरणी ही 15 मेनंतर होत असते. ही पेरणी सर्वसाधारणपणे उन्हाळी पावसावर अवलंबून असते. हा पाऊस पडला नसल्यामुळे याचे क्षेत्र आता मका, बाजरी ही पिके घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 12 टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील 4 लाख 63 हजार 948 हेक्टरपैकी केवळ 56 हजार 13 हेक्टरवरच पेरणी झाली आहे. 

बैलहोंगल तालुक्यात तर शून्य टक्के पेरणी झाली आहे. त्याचबरोबर  चिकोडी तालुक्यात केवळ  एक टक्के तर अथणी आणि रायबाग, सौंदत्ती तालुक्यात केवळ दोन टक्केच पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरणी ही हुक्केरी तालुक्यात झाली असून तेथे आतापर्यंत 52 टक्के पेरणी झाली आहे. त्यानंतर 12 टक्के पेरणी ही खानापूर तालुक्यात झाली आहे. 

पिकामध्ये आतापर्यंत भाताची 15 टक्के पेरणी  झाली आहे. एकूण 62 हजार 533 हेक्टरपैकी 9 हजार 565 हेक्टवर भाताची पेरणी झाली आहे.  नाचणीची अद्याप काहीही पेरणी झालेली नाही. जिल्ह्यात नाचणीचे 3 हजार 162 हेक्टर क्षेत्र असताना पेरणी मात्र काहीही झालेली नाही. 

यावर्षी 1 मार्च ते 31 मे दरम्यान  केवळ 31 मी. मी. पाऊस झाला आहेत. यातील 80 टक्के पाऊस हा गेल्या चार दिवसात झाला आहे.  गतवर्षी या काळात 106 मी. मी. पाऊस झाला होता. हा पाऊस सोयाबिन, मुग आणि उडीदसाठी उपयोग असतो. यावर्षी हा पाऊस केवळ 71 मी. मी. झाला आहे. यामुळे यावर्षी सोयाबीनच्या 97 हजार 184 हेक्टरपैकी केवळ 20 हजार 234 हेक्टरवर सोयाबिनची पेरणी झाली आहे. सोयाबीन, उडीद आणि मुग पेरणीचा काळ आता निघून जात असून, आता हे क्षेत्र मका, बाजरी आणि ज्वारी पिकासाठी जाणार आहे.  

75 हजार मे टन खत शिल्लक

यावर्षी जिल्ह्याला 1 लाख 38 हजार 227 मे. टन खत मंजूर झाले आहे. यामधील 63 हजार 25  मे. टन खतांचे वितरण करण्यात आले आहे. आता कृषी विभागाकडे 75 हजार 202 मे टन खत शिल्लक आहे.  त्याचबरोबर 48 हजार 895 मे. टन बियाणे उपलब्ध असून, यातील 21 हजार 815 मे टन बियाणांचे वितरण करण्यात आले आहे. आता कृषी विभागाकडे 27 हजार 80 मे टन बियाणे शिल्लक असल्याची माहिती कृषी अधिकारी बसवराज अंगडी यांनी दिली.