Tue, Dec 10, 2019 13:45होमपेज › Belgaon › रेल्वे रुळावर आढळली वर्षाची चिमुरडी

रेल्वे रुळावर आढळली वर्षाची चिमुरडी

Published On: Jul 22 2019 2:01AM | Last Updated: Jul 22 2019 2:01AM
खानापूर : प्रतिनिधी

धो धो कोसळणारा पाऊस, घनदाट जंगल आणि वन्य प्राण्यांचा संचार अशा चोहोबाजूंनी धोक्यांनी वेढलेल्या अकराळी (ता. खानापूर) नजीकच्या रेल्वे रुळावर रविवारी सकाळी एक वर्षाची अज्ञात चिमुरडी आढळून आली. तिच्या डोक्याला जखम झाल्याने तिला पालकांनी रेल्वेतून फेकले की अनावधानाने ती खाली पडली, याबाबत संभ्रमावस्था  आहे. या बालिकेवर बेळगाव सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत.

सकाळी दहाच्या सुमारास लोंढा-तिनईघाट रेल्वे मार्गावरील अकराळी गावानजीकच्या रुळाशेजारी शेतकर्‍यांना बालकाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता एक वर्ष वयाची लहानगी बालिका रडत असल्याचे दिसून आले. आजूबाजूला कसलीच लोकवस्ती नसल्याने रेल्वेतून ती पडली असावी, असा अंदाज बांधण्यात आला. याबाबत लोंढा येथील माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबुराव देसाई यांना माहिती देण्यात आली. त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली व लोंढा रेल्वे पोलिसांना याची माहिती देऊन बालिकेला लोंढा सरकारी दवाखान्यात आणण्यात आले.  तिच्या डोक्याला पाठीमागच्या बाजूला जखम झाली आहे. 

त्यानंतर रेल्वे पोलिसांकडे कोठे बालिका बेपत्ता झाल्याची तक्रार आली आहे का याची विचारणा करण्यात आली. मात्र तशी कोठेच तक्रार नोंद नसल्याने सदर बालिका रेल्वे रुळावर कशी पोहोचली, हा तपास हाती घेण्यात आला आहे.

अनावधानाने बालिका पालकांपासून बिछडली असल्यास त्याबाबतची तक्रार कुठेतरी नोंद झाली असती. मात्र बालिका बेपत्ता झाल्याची सायंकाळपर्यंत या मार्गावर कोठेच तक्रार दाखल झाली नव्हती त्यामुळे मुलगी नको असलेल्या जन्दात्यांनी लिंगभेदाच्या मानसिकतेतून तिला धावत्या रेल्वेतून फेकले असावे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

बंध माणुसकीचे !

मानवी वस्तीपासून दूर घनदाट जंगलात आणि कोसळणार्‍या पावसात चिंब भिजलेल्या अवस्थेतील ही बालिका पार हादरून गेली होती. आपले कोण व परके कोण हेही ओळखण्याचे वय नसल्याने तिचा निरागस चेहरा पाहून सर्वांचे डोळे पाणावले. स्थानिकांनी तिला बिस्किट देऊन पाणी पाजल्यानंतर ती निर्धास्तपणे एका शेतकर्‍याच्या खांद्यावर विसावली.

    जन्मदात्यांनीच फेकले की रेल्वेतून पडली, हा प्रश्‍न
    लोंढानजीकच्या अकराळीजवळील घटना