Mon, Aug 19, 2019 02:35होमपेज › Belgaon › बेळगावात 2 तरुणांसह वृद्धाने केली आत्महत्या

बेळगावात 2 तरुणांसह वृद्धाने केली आत्महत्या

Published On: Jul 13 2019 1:37AM | Last Updated: Jul 13 2019 12:25AM
बेळगाव : प्रतिनिधी

शहर परिसरात विविध ठिकाणी शुक्रवारी तिघांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या. याप्रकरणी त्या- त्या पोलिस स्थानकात आत्महत्येच्या घटनांची नोंद झाली आहे. 

माळमारुती पोलिस स्थानकाच्या व्याप्तीतील शिवबसवनगर येथे शिरोळ (ता. कोल्हापूर) येथील युवकाने राहत्या खोलीत आत्महत्या केली. महंमदगौस मौला नायकवाडी (वय 22, रा. शिरोळ) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. या घटनेची नोंद माळमारुती पोलिस स्थानकात झाली आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा युवक येथील नार्वेकर गल्लीमधील एका सोलार कंपनीच्या प्रशिक्षणासाठी आला होता. गेल्या तीन महिन्यांपासून शिवबसवनगर येथे भाडोत्री खोलीत वास्तव्यास होता. त्याने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. माळमारुती पोलिसांनी पंचनामा केला. पोलिस निरीक्षक बी.आर. गड्डेकर अधिक तपास करत आहेत. 

शहापूर पोलिस स्थानकाच्या व्याप्तीत येणार्‍या संभाजी गल्ली येथे कर्जबाजारीपणामुळे युवकाने शुक्रवारी सायंकाळी आत्महत्या केली. यमनाप्पा ऊर्फ  संतोष कुंभार (वय 30 रा. मूळचा रायबाग, सध्या रा. संभाजी गल्ली) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.  पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यमनाप्पा हा संभाजी गल्ली येथे  आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होता. त्याने काम सोडलेे होते. त्यामुळे तो कर्जबाजारी झाला होता. यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत शहापूर पोलिस स्थानकात प्रकरणाची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.

तिसर्‍या घटनेत बापट गल्लीतील प्रकाश बाळाराम निलजकर (वय 65) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांना दारूचे होते, सततच्या व्यसनामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांची मानसिक स्थिती ढासळली होती. शुक्रवारी सकाळी 8.15 च्या सुमारास ते अत्यवस्थ स्थितीत पडल्याचे आढळून आले. घरच्यांनी पाहिले असता त्यांनी विष प्राशन केल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचाराचा उपयोग न होता सायंकाळी 6 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. खडेबाजार पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.