Mon, Sep 16, 2019 11:34होमपेज › Belgaon › मराठी उमेदवारांना नोटीस

मराठी उमेदवारांना नोटीस

Published On: Apr 13 2019 1:41AM | Last Updated: Apr 12 2019 11:55PM
बेळगाव : प्रतिनिधी

निवडणूक प्रचार कार्याच्या खर्चाचा तपशील देण्यास केवळ दहा मिनिटांचा उशीर केलेल्या दोन मराठी उमेदवारांना निवडणूक अधिकार्‍यांनी नोटीस बजावली आहे. यामुळे मराठी भाषिकांतून संताप व्यक्त करण्यात येत असून अधिकार्‍यांनी केवळ आकसातून हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

म. ए. समितीचे उमेदवार महादेव मंगण्णाकर (मच्छे) व शंकर चौगुले (बेळगुंदी) यांना निवडणूक अधिकार्‍यांनी नोटीस बजावली. शुक्रवारी त्यांनी केवळ दहा मिनिटे उशीर केला, म्हणून ठपका ठेवला आहे.
म. ए. समितीने लोकसभा निवडणुकीसाठी 45 उमेदवार दिले आहेत. निवडणूक आयोगाने दोन दिवसांनी एकदा खर्चाचा तपशील देण्याचे उमेदवारांना बंधन घातले आहे. त्यानुसार अधिकार्‍यांकडे तपशील देणे आवश्यक आहे. समितीच्या अन्य उमेदवारांनी तपशील दिला आहे. परंतु, मंगण्णाकर आणि शंकर चौगुले हे कौटुंबिक कारणामुळे थोड्या उशिराने तपशीलासह निवडणूक कार्यालयात हजर झाले. 

सहा वाजेपर्यंत खर्चाचा तपशील देणे बंधनकारक होते. मात्र, दोन्ही उमेदवार 6 वा. 10 मिनिटांनी निवडणूक अधिकार्‍यांच्या कार्यालयात उपस्थित झाले.दोघांनी आपल्या खर्चाचा तपशील अधिकार्‍यांकडे देण्याचा प्रयत्न केला. परंतु, अधिकार्‍यांनी नोटीस बजावली. तुम्हाला दहा मिनिटे उशीर झाला असून कारणे द्या, असा नोटिशीत उल्लेख आहे. यामुळे दोन्ही उमेदवारांनी लेखी उत्तर दिले.