Thu, Dec 05, 2019 20:44होमपेज › Belgaon › राणी चन्‍नम्मांच्या भूमीत नाही महिला खासदार

राणी चन्‍नम्मांच्या भूमीत नाही महिला खासदार

Published On: Apr 07 2019 1:44AM | Last Updated: Apr 07 2019 12:10AM
बेळगाव : प्रतिनिधी

लढावू राणी चन्‍नम्मांच्या भूमिमध्ये 62 वर्षापासून एकही महिला खासदार झालेल्या नाहीत. राष्ट्रीय व राज्य पातळीवरील प्रमुख राजकीय पक्षांचे नेते मात्र वीर राणी चन्‍नम्मांचा केवळ निवडणुकीमध्येच उल्‍लेख करुन त्यांच्या कार्याचा गौरव करतात.

1957 ते 2009 या कालावधीत लोकसभेच्या 15 निवडणुका पार पडल्या. त्या कालावधीमध्ये देशभरातील महिला आपल्याला 33 टक्के राखीवता मिळावी, यासाठी झगडत होत्या. परंतु एकाही राजकीय पक्षाने बेळगाव लोकसभेसाठी महिलांना उमेदवारी दिलेली नाही.

2014 मधील लोकसभा निवडणुकीमध्ये काँगे्रस पक्षाने प्रथम महिला उमेदवार म्हणून बेळगाव लोकसभेमधून लक्ष्मी हेब्बाळकर यांना उमेदवारी दिली होती. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विद्यमान भाजपचे खा. सुरेश अंगडी यांना कडवी झुंज दिली. त्यांना या निवडणुकीमध्ये द्वितीय क्रमांकाची मते मिळाली.

लक्ष्मी हेब्बाळकर यांना या निवडणुकीमध्ये 4 लाख 78 हजार 557 मते पडली तर सुरेश अंगडी यांना 5 लाख 54 हजार 417 मते पडली. या निवडणुकीमध्ये अंगडी हे 75 हजार 860 मताधिक्य घेवून निवडून आले.

2018 मध्ये कर्नाटक राज्यामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय पक्षांनी महिलांना उमेदवारी दिली व तीन महिला या निवडणुकीमध्ये बेळगाव जिल्ह्यात विजयी झाल्या. काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर या बेळगाव ग्रामीण मतदार संघातून, काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर या खानापूर विधानसभा मतदारसंघातून तर भाजपच्या उमेदवार शशिकला जोल्‍ले या निपाणी मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.

बेळगाव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय पक्षांनी महिलांना उमेदवारी दिली तर त्या आपली क्षमता लोकसभा निवडणुकीमध्येही दाखवून देऊ शकतील. एकदा महिलांना संधी देऊन तर पहा. त्यामध्ये आमची पात्रता सिद्ध करुन दाखवू, असे राजकीय पक्षातील काही महिलांचे म्हणने आहे.

चिकोडीतून रत्नमाला सावनूर विजयी

1996 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता दलाने चिक्‍कोडी मतदारसंघातून रत्नमाला सावनूर यांना उमेदवारी दिली होती. त्या निवडणुकीमध्ये त्या मतदारसंघातून सातवेळा निवडून आलेल्या माजी केंद्रीय मंत्री बी. शंकरानंद यांचा त्यांनी 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन ऐतिहासिक विजय मिळविला होता.
रत्नमाला सावनूर यांना 3 लाख 9 हजार 435 मते पडली होती. तर शंकरानंद यांना 1 लाख 96 हजार 676 मते पडली होती. या विजयाने रत्नमाला सावनूर यांनी मातब्बर अशा बी. शंकरानंद यांच्या राजकारणाचा शेवट केला होता.