Thu, Dec 12, 2019 22:41होमपेज › Belgaon › निपाणी नगरपालिका निवडणुक : श्रावणामुळे निवडणुकीत मांसाहारावर टाच

निपाणी नगरपालिका निवडणुक : श्रावणामुळे निवडणुकीत मांसाहारावर टाच

Published On: Aug 14 2018 1:08AM | Last Updated: Aug 13 2018 8:43PMनिपाणी : प्रतिनिधी

येथील नगरपालिकेच्या निवडणुकीचे धूमशान ऐन श्रावणात आल्याने मांसाहारावर टाच आली आहे. परिणामी मतदारांना खुश करण्यासाठी उमेदवारांकडून धार्मिक पर्यटन व भेटवस्तू देण्याला प्राधान्य येण्याची चर्चा सुरू आहे.

अर्ज भरणा केल्यानंतर खर्‍याअर्थाने भोजनावळींना जोर चढणार आहे. निवडणूक काळात मांसाहरीला अधिक प्राधान्य दिले जाते. पण ऐन श्रावणात या निवडणूक आल्याने कार्यकर्त्यांसह मतदारांची पंचाईत झाली आहे.एरव्ही निवडणूक काळात आगाऊ ताटांचे बुकिंंग हॉटेल व धाब्यावर होते. निपाणीत पालिका निवडणुकीचे अद्याप चित्र स्पष्ट  झालेले नाही. निवडणुकीनिमित्त अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. त्यामुळे अर्ज माघारीनंतर खर्‍याअर्थाने निवडणुकीला रंगत येणार आहे.

श्रावण असल्याने शाकाहारी जेवणाचे आयोजन व वैयक्‍तिक भेट वस्तू, पर्यटनावर भर दिला जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उमेदवाराचा खर्च पुन्हा वाढणार आहे.  मांसाहरावर टाच येणार असली तरी उमेदवाराच्या खिशाला दुप्पट खर्चाची कात्री लागणार आहे.

अनेक उमेदवारांनी वॉर्डातील युवावर्ग, महिलांचे गट  करून धार्मिक पर्यटनावर भर दिला आहे. शाकाहारी जेवणाबरोबर एखादी भेटवस्तू देण्यासाठी नियोजन सुरू आहे.खास करून महिलांच्या आवडीच्या भेटवस्तूंना प्राधान्य देण्यात येत आहे. श्रावणात आलेल्या या निवडणुकीमुळे  हॉटेल, धाबे, खानावळींमध्ये एरव्ही असणारी गर्दी रोडावली जाणार आहे, हे निश्‍चित आहे.

निपाणीसह परिसरात 20 ते 25 हॉटेल्स आणि 10 बिअर शॉपी आहेत. ऐन श्रावणात नगरपालिका निवडणूक आल्याने जेवणावळींसाठी होणार्‍या उलाढालीवर परिणाम होणार आहे. या महिन्यात मांसाहार खाणार्‍यांची संख्याही हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असते. त्यामुळे आर्थिक उलाढीलवर परिणाम होणार आहे. शाकाहारीच्या ऑर्डरी मिळणार असल्या तरीही उपवासांमुळे मर्यादा येणार आहेत.   -अरूण खडके,हॉटेल व्यावसायिक