Tue, Aug 20, 2019 08:29होमपेज › Belgaon › बेळगावातून लवकरच नव्या विमानसेवा

बेळगावातून लवकरच नव्या विमानसेवा

Published On: Jul 22 2019 2:01AM | Last Updated: Jul 22 2019 2:01AM
बेळगाव : प्रतिनिधी

बेळगावमधून सध्या चार शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. आता म्हैसूरचे खासदार प्रतापसिंह यांनी 27 ऑक्टोबरपासून म्हैसूर बेळगावशी विमानसेवेने जोडले जाणार असल्याचे ट्विट केले आहे. यामुळे दोन्ही शहरांंच्या पर्यटनवृद्धीसाठी चांगला फायदा होणार आहे.

प्रतापसिंह यांनी सांगितले की, म्हैसूर-बेळगाव विमानसेवा ही सकाळच्या टप्प्यात असेल. सध्या उडाण-3 अंतर्गत बेळगावला 13 मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. त्यातील 4 मार्ग सुरू असून त्याला चांगला प्रतिसाद आहे. उडाण-3 अंतर्गत येणारी म्हैसूर-बेळगाव विमानसेवा सुरू झाल्यास ती पाचवी सेवा असेल. ती येत्या दोन महिन्यांत सुरू होऊ शकेल.

बेळगावहून बंगळूर, मुंबई आणि पुण्याासाठी नियमित सेवा सुरू आहे. इंडिगो कंपनीने बेळगाव-हैद्राबाद विमानसेवा सुरू करण्याचा मानस बोलून  दाखवला आहे. वाढत्या मार्गांमुळे सांबरा विमानतळावर आणखी काही रोजगारही उपलब्ध होतील.

बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी सांगितले की, ट्रूजेट कंपनीने अद्याप आम्हाला म्हैसूर-बेळगाव सेवेबाबत अधिकृतपणे काही कळवलेले नाही. इंडिगो कंपनी ऑगस्टमध्ये बेळगाव-हैदराबाद विमानसेवा सुरू करणार आहे. वाढत्या मागणीमुळे आम्ही बेळगाव-दिल्ली विमानसेवा सुरू करण्याची सूचना केली आहे.

‘उडाण’अंतर्गत सुरू असलेले मार्ग : बेळगाव-हैदराबाद (स्पाईस  जेट), बेळगाव-मुंबई (स्पाईस जेट), बेळगाव-पुणे (अलायन्स एअर), बेळगाव-अहमदाबाद (स्टार एअर). ‘उडाण’ अंतर्गत नसलेले नियमित मार्ग : बेळगाव-बंगळूर तीन फ्लाईट्स (स्पाईस जेट, स्टार एअर आणि अलायन्स एअऱ)

‘उडाण-3’अंतर्गत प्रस्तावित मार्ग :  बेळगाव-तिरूपती (स्टार एअर,  ट्रू जेट), बेळगाव-सुरत (स्टार एअर), बेळगाव-कडाप्पा (ट्रू जेट), बेळगाव -म्हैसूर (ट्रू जेट), बेळगाव-इंदूर (स्टार एअर), बेळगाव-जोधपूर (स्टार एअर), बेळगाव-जयपूर (स्टार एअर), बेळगाव-ओझर (नाशिक) (स्टार एअर), बेळगाव-नागपूर (स्टार एअर).