Tue, Dec 10, 2019 13:44होमपेज › Belgaon › बेळगाव मनपा वगळून पालिका निवडणुका जाहीर

बेळगाव मनपा वगळून पालिका निवडणुका जाहीर

Published On: May 03 2019 2:02AM | Last Updated: May 02 2019 11:49PM
बंगळूर : प्रतिनिधी

सदलगा आणि मुगळखोड नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीसह राज्यातील एकूण 118 पालिकांची निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 29 मे रोजी मतदान होणार आहे. मात्र, यातून बेळगाव महापालिकेसह रामनगर, कोडगू, गुलबर्गा महापालिकांना वगळण्यात आले आहे.

दरम्यान, सदलगा आणि मुगळखोडच्या दोन नगरसेवकांचे निधन झाल्याने दोन्ही नगरपालिकांच्या प्रत्येकी एक जागेसाठी 29 रोजी मतदान होईल. त्याबरोबरच 63 नगरपालिका, 33 नगरसभा आणि 22 नगर पंचायतींसाठीही 29 मे रोजी मतदान होईल.

दि. 9 रोजी त्या त्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी निवडणुकीची अधिसूचना जारी करणार आहेत. त्यादिवसापासूनच उमेदवारी अर्ज भरता येतील. 16 मे ही अर्ज दाखल करण्याची शेवटी तारीख आहे. दि. 17 मे रोजी अर्जांची छाननी होईल.  20 मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असणार आहे.

दि. 29 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंत मतदान होईल. फेर मतदानाची आवश्यकता असल्यास मतदान दि. 30 मे रोजी होणार आहे. 31 मे रोजी तालुका केंद्रांमध्ये मतमोजणी होणार आहे. उमेदवाराच्या निधनामुळे सदलगा वॉर्ड क्र. 19 आणि मुगळखोड वॉर्ड क्र. 2 मध्ये पोटनिवडणूक होणार आहे. तर बेळगाव, रामनगर, कोडगू,  गुलबर्गा महापालिकांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका असल्याने येथील निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.