Tue, Dec 10, 2019 13:44होमपेज › Belgaon › सासू सुनेने केला एकत्रितपणे देहदानाचा संकल्प

सासू सुनेने केला एकत्रितपणे देहदानाचा संकल्प

Published On: Jul 16 2019 9:46AM | Last Updated: Jul 16 2019 9:46AM
बेळगाव : प्रतिनिधी

बायको (स्त्री) ही क्षणभराची पत्नी व अनंतकालची माता असते. “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ ही वचने नितांत सत्य आहेत. कुटुंबाचा केंद्रबिंदू असलेली ही स्त्री जेव्हा सूनरूपी दुसरी स्त्री घरात येते तेव्हा तिची मानसिकता कशी बदलते. अर्थात अत्यंत प्रेमाने, आदराने नाते जोपासणाऱ्या पुष्कळ स्त्रिया आहेत. मात्र “सासूबाई’ हा शब्द जरी कानावर पडला तर प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एक वेगळी प्रतिमा दिसून येते. याउलट सासू, सुना सुज्ञ, समंजस असतील तर घरात “स्वर्ग’ उतरतो व सर्वांचीच वाटचाल अधिक सुलभ व यशस्वी होते.

सदाशिव नगर येथील अशाच एका मैत्रीपूर्ण वातावरणात राहणाऱ्या सासू-सूनेनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प करून समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. सह्याद्री सोसायटीच्या माजी चेअरमन श्रीमती अनिता अशोक कोकितकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मरणोत्तर देहदान करण्याचा विचार केला. जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक मदन बामणे, अध्यक्ष शिवराज पाटील आणि भरत गावडे यांनी त्यांचा अर्ज भरून घेत असतानाच त्यांच्या सूनबाई शितल अमित कोकितकर यांनीसुद्धा सासूबाईंच्या पावलावर पाऊल ठेऊन आपणसुद्धा देहदान करण्याचे जाहीर केले.

दोघीही सासू-सूनेने याचा अर्ज भरून जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात दिला असून त्यांचे रीतसर प्रमाणपत्र घेतले आहे. वकील अमित कोकितकर यांनी आपल्या आई आणि पत्नीच्या निर्णयाला पाठिंबा देत प्रत्येकाने याचे अनुकरण करावे असे सांगितले.

गेल्या दोन वर्षांपासून जायंट्स आय फौंडेशन ही संस्था नेत्रदान आणि देहदान याविषयी जागृती आणि प्रत्यक्षात कृती करण्यात अग्रेसर आहे. प्रत्येकाने किमान मरणोत्तर नेत्रदान तरी करावे जेणेकरून अंध व्यक्तींना ही सृष्टी पाहता येईल असे आवाहन जायंट्स आय फौंडेशनच्या वतीने करण्यात आले.