Thu, Dec 12, 2019 22:33होमपेज › Belgaon › ‘रोहयो’त लुडबूड केल्यास फौजदारी 

‘रोहयो’त लुडबूड केल्यास फौजदारी 

Published On: Jun 18 2019 2:03AM | Last Updated: Jun 17 2019 10:31PM
बेळगाव : प्रतिनिधी

रोजगार हमी योजना अकुशल कामगारांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केली आहे. यामध्ये राजकीय श्रेय लाटण्यासाठी ग्रा. पं. मध्ये सदस्यांकडून लुडबूड सुरू आहे. याला ग्रा. पं. च्या कर्मचार्‍यांनी बळी पडू नये. कामात अडथळा आणणार्‍या ग्रा. पं. सदस्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. त्याचबरोबर त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस वरिष्ठ अधिकार्‍यांकडे करण्याचा इशारा ता. पं. साहाय्यक कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी दिला.

तालुका पंचायत सभागृहात सोमवारी रोजगार हमी योजनेतील कामगार आणि पीडीओ, सेक्रेटरी यांची बैठक आयोजित केली होती. व्यासपीठावर ता. पं. कार्यकारी अधिकारी पद्मजा पाटील, साहाय्यक कार्यकारी अधिकारी कलादगी, ग्रामीण कुलिकार संघटनेचे  शिवाजी कागणीकर, दिलीप कामत होते.

केदनूर, कडोली, जाफरवाडी, देवगिरी, गुंजेनहट्टी, केदनूर, हंदिगनूर, अगसना, कंग्राळी (खु.), कंग्राळी (बु.) होनगा, पिरनवाडी, धामणे, सुळगा, कल्लेहोळ, बेकिनकेरे, बिजगर्णी येथील रोहयो कामगार उपस्थित होते. 

केदनूर येथील कामगारांनी ग्रा. पं. पीडीओ रोहयो कामगारांनी एनएमआर देत नसून ग्रा. पं. उपाध्यक्षांकडे देण्यात येत असल्याची तक्रार केली. यावर कलादगी यांनी संताप व्यक्त केला. रोहयोच्या कामात कोणत्याही सदस्यांना हस्तक्षेप करण्यासाठी वाव देण्यात येऊ नये. सरकारी कामाचे श्रेय लाटण्याचे काम राजकीय व्यक्तीकडून होते. यामुळे कायकबंधूंकडे एनएमआर द्यावे. राजकीय ढवळाढवळ करणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल. सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे करण्यात येईल, असे सांगितले

कडोलीतील कामगारांनी रोहयोचे वेतन कमी मिळत असल्याची तक्रार नोंदविली. ग्रा. पं. कर्मचारी वेळेत मोजमाप करत नाहीत. याचा फटका कामगारांना सहन करावा लागतो. बंबरगा येथील कामगारांनी केवळ 40 रु. वेतन मिळत असल्याचे सांगितले. 

यावर अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून योग्यप्रकारे कामाची नोंद करावी. याकडे दुर्लक्ष करणार्‍या ग्रा. पं. कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.कामगारांना मागणीनुसार काम उपलब्ध करून द्या. रोहयोची कामे सात खात्यांकडून देण्यात येत आहेत. यामुळे कामाची व निधीची कमतरता नसल्याचे सांगितले.

सुविधांची वानवा

कामाच्या ठिकाणी पाणी, निवारा आणि प्रथमोपचाराची कमतरता आहे. ग्रा. पं. कडून कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत नाहीत, असा आरोप कामगारांनी केला. यावर अधिकार्‍यांनी कामगारांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे आदेश बजावले. यासाठी कामगारांची गावपातळीवर बैठक घेण्याची सूचना केली. 

सन्मान नको, हाताला काम द्या

बैठकीत अधिकार्‍यांनी ग्रा. पं. मध्ये येणार्‍या कामगारांना सन्मान द्या, अशी सूचना केली. यावर समाजसेवक शिवाजी कागणीकर यांनी कामगारांना कोणत्याही सन्मानाची गरज नाही. परंतु दोन वेळचे पोट भरण्यासाठी काम आवश्यक असून काम पुरवा, अशी मागणी केली.