Thu, Dec 05, 2019 20:47होमपेज › Belgaon › बेळगावात दररोज ३५ लाख उलाढालीचा ‘मटका दरबार’ 

बेळगावात दररोज ३५ लाख उलाढालीचा ‘मटका दरबार’ 

Published On: Jul 17 2019 2:05AM | Last Updated: Jul 17 2019 12:31AM
बेळगाव : प्रतिनिधी

मटक्यावर जुजबी कारवाईचा फार्स होताना दिसत असून,  शहरातील मटका धंदा अधिक तेजीत सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.  शहरातून दररोज 35 लाख रुपये इतकी भव्य  उलाढाल  मटका धंद्यातून होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई, कल्याण असे बोलावण्याऐवजी आता याला ‘बेळगाव दरबार’ असे नाव देऊन सहा जणांच्या सिंडिकेटद्वारे बेळगाव शहर, उपनगर व तालुक्यात मटका दरबार फोफावल्याचे दिसून येते.  

अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा मटका बेळगावात वर्षानुवर्षे सुरू आहे. आधी तो शहराबाहेर एकाच ठिकाणी कुठे तरी मोठ्या प्रमाणात होता. परंतु, शिनोळी, कुद्रेमानी येथील जुगार आणि मटका अड्डे बंद झाल्यानंतर तो शहरात विस्तारला आहे. पूर्वीचे काही मटका किंग आता हयात नसले, तरी त्यांच्या हाताखाली तयार झालेले त्यांचे शिष्यगण सिंडिकेट तयार करून मटका व्यवसाय चालवत असल्याचे समोर आले आहे. 

पूर्वी मुंबईहून मटक्याचे अंक जाहीर होत होते आणि बेळगावातील काही ठरावीक मटका बुकींकडून ही साखळी चालवली जात होती; परंतु आता बेळगावात बसूनच सहा जणांच्या टोळक्याकडून मुंबईची सूत्रे हलविली जात आहेत. आता मुंबईच्या आकड्याची प्रतीक्षा न करता बेळगावातच मटक्याचा आकडा तयार करून तो राज्यातील अन्य जिल्ह्यांना पुरविण्यापर्यंत या सिंडिकेटची मजल गेली आहे. 

शहरात ‘बेळगाव दरबार’ 

सिंडिकेट दिवसेंदिवस इतकी मजबूत बनत आहे की, आता त्यांनी एकत्रित येऊन बेळगावच्या मटक्यासंबंधीचा एक वेगळा आराखडा तयार करण्याचा विचार चालविला आहे. यासाठीच त्यांनी शहरातील एका गुपित ठिकाणी सोमवारी (ता. 15 जुलै) बैठकही घेतल्याची माहिती मिळाली आहे.  बेळगावातून निघणार्‍या मटका आकड्याला बेळगाव दरबार असे नाव दिले होते. परंतु, आता यासाठी नवे नाव शोधण्याचा प्रयत्न सिंडीकेटकडून सुरू आहे. 

35 लाखांची उलाढाल

ज्याला मटक्याची चटक लागली ती सुटत नाही, हे ओळखलेल्या सिंडीकेटने संपूर्ण शहरभर असे काही जाळे विणले आहे की, पोलिस कारवाईपासूनही कसे वाचावे, याचा त्यांनी पुरेपूर अभ्यास केल्याचे दिसून येते. यामुळेच शहरात दररोज 35 लाख रूपयांची मटक्यातून उलाढाल होते.  पोलिसांनी मात्र जुजबी कारवाई चालवली आहे.

आकड्याला विविध नावे 

पूर्वी मटका हा फक्त मुंबई व कल्याण अशा दोन नावानेच ओळखला जायचा. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून मुंबई मटका बंद झाला असून, फक्त कल्याण सुरू आहे. परंतु, स्थानिक सिंडिकेटने आता पुणे डे, पुणे नाईट, संगम, बेळगाव दरबार, मुंबई डे, मुंबई नाईट अशा वेगवेगळ्या नावांनी मटका घेण्यास सुरवात केली आहे.