Mon, Dec 09, 2019 10:59होमपेज › Belgaon › मुत्नाळमध्ये युवतीवर सामूहिक बलात्कार

मुत्नाळमध्ये युवतीवर सामूहिक बलात्कार

Published On: Jun 15 2018 1:04AM | Last Updated: Jun 15 2018 12:24AMगडहिंग्लज : प्रतिनिधी

मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथील 22 वर्षीय युवतीवर घरात घुसून दोघा नराधमांनी बलात्कार केला. यातील गुरुसिद्ध अशोक कारापगोळ (रा. कोन्‍नूर, ता. गोकाक, जि. बेळगाव) याला गडहिंग्लज पोलिसांनी अटक केली असून, दुसरा संशयित अविनाश अशोक हट्टी (रा. मुत्नाळ, ता. गडहिंग्लज) फरारी आहे. सामूहिक बलात्काराच्या या घटनेने मुत्नाळ परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी हट्टीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.

पीडित तरुणी आई, वडिलांसमवेत राहते. पीडित तरुणी दहा वर्षांपूर्वी आठवीला असताना मेंदूला रक्‍तपुरवठा कमी होत असल्यामुळे वर्गात चक्‍कर येऊन पडली होती. त्यावेळेपासून तिच्यावर औषधोपचार सुरू आहेत, त्यामुळे तिची शाळा बंद केली होती.

मंगळवारी (12 जून) सकाळी साडेसातच्या सुमारास तिचे आई-वडील शेताकडे गेले होते. थोड्यावेळाने ती कपडे धूत असताना, अविनाश हट्टी व गुरुसिद्ध कारापगोळ हे दोघे तिच्या घराजवळच उभे होते. धुण्याचा साबण संपल्याने तो आणण्यासाठी ती घरामध्ये गेली असता, हे दोघेही तिच्या घरात घुसले. यातील एकाने पुढील दरवाजा बंद करून कडी घातली, तर दुसर्‍याने पाठीमागील दरवाजाला कडी घातली. या दरम्यान तिने ओरडण्याचा प्रयत्न केला असता, दोघांनीही तिचे तोंड दाबून धरले.

अविनाश आणि गुरुसिद्ध या दोघांनीही धमकावत तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, तिने आरडाओरड सुरू केल्यावर दोघेही मागील दाराने पळून गेले. दरम्यान, तरुणी बेशुद्ध पडली. शेजारच्या लोकांना ती बेशुद्ध पडल्याचे लक्षात आले. त्यांनी तिला खासगी दवाखान्यामध्ये उपचारसाठी नेले.

मुलगीला दवाखान्यामध्ये नेल्याचे समजताच आई, वडीलही दवाखान्यात आले. घरात आणल्यानंतर पीडितेने रडत आईला सर्व प्रकार सांगितला. पीडितेला पुन्हा त्रास होऊ लागल्याने तिला उपचारासाठी गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडितेच्या आईने गडहिंग्लज पोलिसांत हट्टी व कारापगोळ या दोघांविरोधात गुरुवारी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणामुळे गडहिंग्लज तालुक्यात खळबळ उडाली असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक विपिन हसबनीस, उपनिरीक्षक व्ही. बी. कुरणे करत आहेत.

कर्नाटकातील संशयिताच्या मुसक्या आवळल्या

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवत कर्नाटकामध्ये असलेल्या गुरुसिद्ध अशोक कारापगोळ याला ताब्यात घेतले. कारापगोळ हा कार्यक्रमानिमित्त पाहुण्याकडे  मुत्नाळमध्ये आठवड्याभरापूर्वी आला होता. अविनाशबरोबरच्या मैत्रीतून तोही या कृत्यामध्ये सामील झाला. त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, दुसरा संशयित अविनाश हट्टी फरार झाला आहे.

पीडितेच्या असहाय्यतेचा नराधमांकडून गैरफायदा

यातील पीडित मुलगी ही मेंदूला होणार्‍या अपुर्‍या रक्‍तपुरवठ्याअभावी थोडीशी कमी तल्‍लख होती. तिला चक्‍कर येत असल्यामुळे आई, वडील तिला शेताकडे नेण्याचे टाळत. पीडितेला ऐकण्यासही थोडे कमी येत होेते. याचाच गैरफायदा या नराधमांनी घेऊन तिच्यावर बलात्कार केला.