होमपेज › Belgaon › मराठी शाळांची द्विशताब्दीकडे वाटचाल

मराठी शाळांची द्विशताब्दीकडे वाटचाल

Published On: Feb 27 2019 1:14AM | Last Updated: Feb 26 2019 11:10PM
बेळगाव : परशराम पालकर 

बेळगाव व खानापुरात मिळून 586 सरकारी शाळा कार्यरत आहेत. त्यापैकी बेळगाव तालुक्यात 234 तर खानापूर तालुक्यात 342 शाळा आहेत. बेळगाव शहरात 17 ग्रामीण, भागात 23, खानापुरात 12 सरकारी मराठी शाळांनी शंभरी ओलांडली आहे. बेळगावात 1830 साली पहिली सरकारी मराठी शाळा सुरु झाली. तिला यंदा 189 वर्षाचा इतिहास आहे.

बेळगावात मारुती गल्लीत पहिली सरकारी मराठी मुलींची शाळा 1856 साली सुरु करण्यात आली. त्या शाळेला यंदा 163 वर्षाचा इतिहास आहे. खानापूर तालुक्यात एकूण सरकारी शाळा 342 आहेत तर त्यापैकी 220 शाळा सरकारी मराठी मुला मुलींच्या आहेत. आजही बेळगावसह सीमाभागात मराठी शाळा आहेत. बेळगावात स्थापन झालेली सुरुवातीला ही पहिली सामान्य शाळाच होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1948 साली जीवन शिक्षण शाळेमध्ये रुंपातर झाले. 1969 साली पुन्हा जीवन शिक्षण पध्दती शाळेचे रुंपातर पुन्हा सामान्यशाळेत करण्यात आले.  शाळेची इमारत तीन मजली असून एकूण क्षेत्रफळ 3320 चौरस फुट आहे. 

पहिली मुलींची शाळा 1956 साली स्त्री शिक्षणीन्तेजक मंडळ या नावे सुरु झाली. रावबहादूर राघोबा जनार्दन व अनंत बल्लाळ लुकलुके यांनी पुढाकार घेऊन 1868 साली शाळेची नवीन इमारत बांधली.
या शाळेचा इतिहास मोडी भाषेत लिहीला असल्याने या शाळेचे पहिले मुख्याध्यापक कोण हा इतिहास मिळू शकला नाही. सरकारी मराठी शाळा जगवाव्यात या उद्देशाने शाळा सुधारणा समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर शाळेची पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न सुरु झाले. आजतागायत ते होताना दिसत आहेत.