Thu, Dec 12, 2019 22:19होमपेज › Belgaon › मराठा मंडळ शाळेत काढली आषाढी एकादशी निमित्त ग्रंथदिंडी

मराठा मंडळ शाळेत काढली आषाढी एकादशी निमित्त ग्रंथदिंडी

Published On: Jul 13 2019 1:05PM | Last Updated: Jul 13 2019 1:05PM
बेळगाव : प्रतिनिधी

मराठा मंडळ इंग्रजी माध्यम शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज आषाढी एकादशी निमित्त ग्रंथदिंडीचे आयोजन केले. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी विठ्ठल, रखुमाई, संत नामदेव, तुकाराम, मुक्ताई अशा विविध संताच्या वेषभूषा केल्या होत्या. 

विठ्ठलाच्या ओढीने, विठ्ठलाच्या प्रेमाने, त्याच्या दर्शनासाठी अशा प्रकारे सर्वांगांनी विठ्ठलमय झालेल्या 12 ते 14 लाख वारकर्‍यांच्या साक्षीने वारकरी संप्रदायातील परमोच्च आनंददायी सोहळा काल पंढरपूरात आषाढी झाला. याचनिमित्ताने मराठा मंडळ इंग्रजी शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीत विद्यार्थ्यांनी विविध संताच्या वेशभूषा करत सहभाग घेतला होता. 

यावेळी ग्रंथदिंडीच्या अग्रभागी विद्यार्थ्यांचे लेझीम पथक होते. त्यानंतर भजनीमेळा होता. मध्यभागी फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी, विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणि पादुका ठेवण्यात आल्या होत्या. भरजरी साड्या ड्रेसमध्ये नाकात नथ घालून नटलेल्या शाळेच्या विद्यार्थिनी डोक्यावर तुळशीवृंदावन घेतल्या होत्या. यामुळे शाळेच्या प्रांगणात अवघी पंढरी अवतरल्याचे वातावरण झाले होते.

दिंडीच्या समारोपप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यावेळी श्रीमती पद्मजा नाथाजीराव हलगेकर, उपाध्यक्ष राजेश हलगेकर आणि सौ धनश्री हलगेकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता मुख्याध्यापिका सुचेता कुलकर्णी यांनी पसायदान म्हणून केली. यावेळी शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षिका यावेळी उपस्थित होत्या.