Sun, Dec 08, 2019 21:44होमपेज › Belgaon › महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी आज सुनावणी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी आज सुनावणी

Published On: Jul 09 2019 1:11AM | Last Updated: Jul 09 2019 1:11AM
नवी दिल्ली, बेळगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी महत्त्वाची सुनावणी मंगळवारी (दि. 9) होणार आहे. सीमाप्रश्‍नी जानेवारी महिन्यात सुनावणी झाली होती. त्यावेळी त्रिसदस्यीय खंडपीठात कर्नाटकातील न्यायमूर्तीचा सहभाग असल्यामुळे महाराष्ट्राच्या वकिलांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे सुनावणी लांबणीवर पडली होती. त्यानंतर उन्हाळी सुटी लागल्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही. आता न्यायालय नियमित सुरू झाल्यामुळे रोटेशननुसार सुनावणी होणार आहे.

मंगळवारी होणारी सुनावणी न्यायमूर्ती रोहिंग्टन फली नरीमन, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर होणार आहे. महाराष्ट्राच्या वतीने अ‍ॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड  शिवाजी जाधव, ज्येष्ठ विधिज्ज्ञ अ‍ॅड. अरविंद दातार, अ‍ॅड. संतोष काकडे, अ‍ॅड. अपराजिता सिंग यांच्यासह इतर वकील बाजू मांडणार आहेत. तर कर्नाटकाच्या वतीने अ‍ॅड. व्ही. एन. रघुपती व इतर वकिल बाजू मांडणार आहेत.

सध्या याचिका साक्षी, पुरावे तपासणीच्या स्थितीत आहे. महाराष्ट्राचे दोन आणि कर्नाटकाचे दोन अशा चार अंतरिम अर्जावर आणि कर्नाटकाच्या याचिका कालबाह्य आहे, या मागणीवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राकडून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विधिज्ज्ञ हरिष साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण, ते विदेशात असल्यामुळे मंगळवारी होणार्‍या सुनावणीत ते उपस्थित राहणार नसल्याचे समजते. पण, वरीष्ठ वकिलांनी सुनावणीबाबत समिती नेत्यांशी चर्चा केली आहे.