Mon, Nov 20, 2017 17:21होमपेज › Belgaon › बेळगाव विधानसभेत रण!

बेळगाव विधानसभेत रण!

Published On: Nov 15 2017 1:46AM | Last Updated: Nov 15 2017 1:46AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

पोलिस उपअधीक्षक एम. के. गणपती यांच्या आत्महत्ये प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. गणपती आत्महत्याप्रकरणी बंगळूर विकास मंत्री के. जे. जॉर्ज अडचणीत आले आहेत. जॉर्ज यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने चंग बांधला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी जॉर्ज राजीनाम्याच्या मागणीवरून भाजप सदस्यांनी मंगळवारी सभापतींच्या आसनासमोर धरणे धरले. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजपविरोधात काँग्रेस आमदारांनी गदारोळ उठविला. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या रणात विधानसभेचा दुसरा दिवस वाया गेला. 

हिवाळी अधिवेशनादरम्यान वादग्रस्त विषयावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपने चालविला आहे. विधान परिषदेत काल सोमवारी झालेल्या वादळी चर्चेनंतर मंगळवारी विधानसभेत भाजप सदस्यांनी पोलिस उपअधीक्षक एम. के. गणपती यांच्या आत्महत्येप्रकरणी बंगळूर विकासमंत्री के. जे. जॉर्ज यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. विरोधी पक्षनेते जगदीश शेट्टर यांनी गणपती यांच्या आत्महत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. सीबीआयमार्फत कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे जॉर्ज यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी केली. 

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कायदामंत्री जयचंद्र यांनी जॉर्ज यांची बाजू सांभाळत गणपती आत्महत्या प्रकरणावर यापूर्वी बरीच चर्चा झाली आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायलयात गेल्यामुळे या संदर्भात चर्चा करण्याऐवजी विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांनी बोलावे असा टोला लगाविला. दुपारच्या सत्रात सदनातील गदारोळ कायम राहिला. काँग्रेस आमदारांनी भाजपविरोधात घोषणाबाजी केली. सभापती कोळ्ळीवाड यांनी वाढता गदारोळ पाहत सदनाचे दुसर्‍या दिवसाचे काम तहकूब केले.