Mon, Dec 09, 2019 11:37होमपेज › Belgaon › फळ नमुना तपासणीसाठी निधीची कमतरता

फळ नमुना तपासणीसाठी निधीची कमतरता

Published On: Jun 09 2019 1:23AM | Last Updated: Jun 08 2019 11:27PM
बेळगाव : प्रतिनिधी

घातक रसायनांचा वापर करून पिकविण्यात येणार्‍या फळांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी आवश्यक निधी नसल्याची नामुष्की अन्न सुरक्षा विभागावर ओढवली आहे. 10 फळांच्या नमुन्यांची तपासणीसाठी 80 हजार आवश्यक असून अधिकार्‍यांपुढे निधीची समस्या निर्माण झाली आहे.

जि. पं. च्या गुरुवारी झालेल्या आरोग्य आणि शिक्षण स्थायी समितीच्या बैठकीत आरोग्याधिकार्‍यांना अध्यक्ष रमेश गोरल यांनी धारेवर धरले होते. बाजारातील बहुतांश फळे कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून पिकविण्यात येतात. यामध्ये गुंतलेल्या व्यापार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली होती. परंतु अधिकार्‍यांसमोर नमुना तपासणीसाठी भराव्या लागणार्‍या निधीची समस्या निर्माण झाली आहे. आरोग्य खात्याच्या अन्न सुरक्षा विभागाकडे बाजारात विक्रीसाठी येणार्‍या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे. मात्र या खात्याकडून अद्याप एकही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे संतप्त बनलेल्या जि. पं. सदस्यांनी स्थायी समिती बैठकीत सूचना केली होती. त्याचबरोबर यापूर्वी झालेल्या फेब्रुवारी महिन्यातील बैठकीत आदेश बजावले होते. त्यानुसार सफरचंदचा नमुना तपासणीसाठी पाठविला होता. हा अहवाल चार महिन्यानंतर मिळाला. विशेष म्हणजे यामध्ये फळे खाण्यास लायक असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. एका फळाच्या नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेकडून आठ हजार रु. डिपॉझिट म्हणून भरून घेण्यात येतात. स्थायी समिती बैठकीत दहा नमुने पाठविण्याची सूचना केली होती. याची कार्यवाही करताना सध्या निधीची चणचण जाणवत आहे. यामुळे ही कारवाई रेंगाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तपासणी पुण्यामध्ये

फळ पिकविण्यासाठी घातक रसायनांचा वापर करण्यात येतो. याचा शोध प्रयोगशाळेत घेण्यात येतो. ही सुविधा केवळ बंगळूर येथे आहे. परंतु सध्या ही सुविधा बंद असल्याने पुणे येथील राष्ट्रीय द्राक्ष अनुसंधान विभागात नमुने पाठविण्यात येतात. राज्यात फळांचे नमुने तपासणी प्रयोगशाळा नसल्याने नागरिकांचे आरोग्य रामभरोसे असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

फळे पिकविण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने घातक असतात. यामुळे नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण होते. यावर आळा घालण्यासाठी फळांच्या तपासणीची मागणी केली आहे. आरोग्य खात्याने यासाठी प्रयत्न चालविले आहेत. मात्र त्यांना निधीची कमतरता जाणवत असल्याची माहिती देण्यात आली आहे.- रमेश गोरल, अध्यक्ष जि. पं. आरोग्य स्थायी समिती