Sat, Jan 18, 2020 23:17होमपेज › Belgaon › कोयनेतून पाणी सोडण्यासाठी चिकोडीजवळ रस्ता रोको

कोयनेतून पाणी सोडण्यासाठी चिकोडीजवळ रस्ता रोको

Published On: May 02 2019 12:11PM | Last Updated: May 02 2019 11:49AM
अंकली (जि. बेळगाव) : वार्ताहर

कृष्णा नदी पात्रात कोयना जलाशयातून चार टीएमसी पाण्यासाठी गुरुवारी सकाळपासून मांजरी, येडूर, चंदूर, इंगळी व अंकली ग्रामस्थांनी चिकोडी-मिरज राज्य महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले. 

गेल्या दोन महिन्यापासून कृष्णेचे पात्र पूर्णतः कोरडे पडल्यामुळे चिकोडी उपभागातील चिकोडी, अथणी, रायबाग तालुक्याबरोबरच विजापूर, बागलकोट जिल्ह्यातील ग्रामस्थांना पाणी समस्येसाठी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमावर्ती भागात राजापूर येथे महाराष्ट्राच्या हद्दीत बंधारा असून या बंदराच्या पलीकडे कृष्णा नदीत मुबलक पाणीसाठा आहे. तर कोयना जलाशयातून चार टीएमसी पाणी कर्नाटकाच्या वाटय़ाला प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात सोडण्याचा करार आहे. तरीदेखील महाराष्ट्र पाणी सोडण्यासाठी अद्याप तयार  नाही. 

कर्नाटक सरकार यासाठी विशेष प्रयत्न करत नसल्याने यासाठी आज (गुरूवारी) मांजरी, येडूर, चंदूर, इंगळी, अंकलीसह परिसरातील ग्रामस्थांनी चिकोडी मिरज राज्य महामार्ग रोको करत सरकारवर रोष व्यक्त केला. जोपर्यंत कृष्णेत पाणी येत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहील अशी घोषणा येथील आंदोलकांनी दिल्या आहेत.