Sun, Dec 08, 2019 21:47होमपेज › Belgaon › एकाच मतदारसंघातून सलग आठव्यांदा रिंगणात

एकाच मतदारसंघातून सलग आठव्यांदा रिंगणात

Published On: Apr 18 2019 2:03AM | Last Updated: Apr 17 2019 9:59PM
कोलार राखीव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार म्हणून के. एच. मुनीयप्पा यंदा सलग आठव्यांदा रिंगणात आहेत. यंदा त्यांनी विजय मिळवल्यास सी. के. जाफर शरीफ यांचा सर्वाधिक वेळा संसदेत प्रवेश करण्याच्या विक्रमाशी ते बरोबरी करतील.

राज्यातील एकाच मतदारसंघातून सलग आठवेळा, अन् तेही अनुसूचित जातीमधून विजयी होणारे ते पहिलेच नेते आहेत. 1991 पासून 2014 पर्यंत झालेल्या सात निवडणुकांमध्ये त्यांनी सलग सातवेळा विजय मिळवला. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी विविध खाती सांभाळली आहेत. 

चिकोडी लोकसभा मतदारसंघातून बी. शंकरानंद यांनी सलग सातवेळा निवडणूक जिंकली होती. 1967 ते 1991 पर्यंत त्यांनी सलग निवडणुका जिंकल्या. 1996 मध्ये निजदच्या रत्नमाला सावनूर यांनी त्यांची विजयी घोडदौड रोखली. 

राज्य विधानसभा निवडणूक दहावेळा जिंकण्याचा विक्रम मल्‍लिकार्जुन खर्गे यांच्या नावावर आहे. तर सी. के. जाफर शरीफ यांनी लोकसभा निवडणूक सर्वाधिक आठवेळा जिंकली. कनकपूरमधून एकदा आणि सातवेळा बंगळूर उत्तरमधून त्यांनी निवडणूक जिंकली. रेल्वेमंत्री म्हणून त्यांनी लोकप्रियता मिळवली होती. 1996 मध्ये त्यांनी अनिवार्य कारणास्तव निवडणूक लढवली नव्हती. 2004 आणि 2009 मध्ये त्यांनी निवडणूक लढवली  पण ते भाजपकडून पराभूत झाले.

बिदर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले रामचंद्र वीरप्पा यांच्या नावावरही सलग सातवेळा निवडून येण्याचा विक्रम नोंद आहे. 96 व्या वर्षीही ते खासदार म्हणून निवडून आले होते. सर्वात ज्येष्ठ खासदार बनण्याचा मान त्यांना मिळाला. काँग्रेस, भाजपसह चार पक्षांकडून त्यांनी उमेदवारी मिळवली होती. 1962 आणि 1967 मध्ये काँग्रेसतर्फे निवडणूक लढवून यश मिळवले. 1971 मध्ये एनसीओ, 1977 मध्ये बीएलडी पक्षातून निवडणूक लढवून पराभूत झाले. त्यानंतर पंधरा वर्षे निवडणुकीपासून दूर राहिले. त्यानतंर भाजपमध्ये प्रवेश करुन त्यांनी 1991 मध्ये निवडणूक लढवून ती जिंकली.